शरद पवारांच्या विद्या प्रतिष्ठानने लाटली शाळेची जमीन

sharad-pawar
बारामती – माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानने का-हाटी (ता. बारामती) येथील कृषिमूल उद्योग संस्थेची ७३ एकर जमीन लाटली असल्याचा आरोप का-हाटीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला. संस्थेच्या उपाध्यक्षांनीही जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेला विरोध केला असून याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कृषिमूल संस्थेचे अध्यक्ष असून या संस्थेच्या संचालक मंडळाने आपली संस्था विद्या प्रतिष्ठानशी जोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मूळ शिक्षण संस्था, त्यातील कर्मचारी यांना समाविष्ट न करता विद्या प्रतिष्ठानने कृषिमूल संस्थेच्या मालकीची ७३ एकर जमीन हस्तांतरीत करून घेतले. त्याला आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी ग्रामसभेत सांगितले. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील गायरान सरकारी जमीन घेतल्याची तक्रार यापूर्वीच विद्या प्रतिष्ठानविरोधात दाखल आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आणखी एक आरोप झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.

शेतक-यांच्या मुलांसाठी रत्नागिरी येथील डॉ. अच्युतराव पटवर्धन यांनी १९५२ मध्ये ही संस्था उभारली. पुढे माजी विद्यार्थ्यांनीच ही संस्था चालवावी असा त्यांचा मानस होता; परंतु कालांतराने काही व्यापारी मंडळींनी या संस्थेत शिरकाव केला. काही ज्येष्ठ समाजसेवकही पदाधिकारी आहेत, मात्र ते फारसे लक्ष देत नाहीत. आता राष्ट्रवादीचेच वर्चस्व असलेल्या या संस्थेची जमीन लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विश्वास चांदगुडे यांनी ग्रामसभेत केला.

Leave a Comment