आव्हान दहशतवाद्यांच्या तंत्रसज्जतेचे

twitter
जगभर इस्लामी राज्याची स्थापना करण्याच्या विचाराचा प्रसार करणारे आणि आपल्या विखारी प्रचाराने मुस्लीम युवकांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यास प्रवृत्त करणारे ट्विटर अकाउण्ट भारतातून; ते ही बंगळूरूसारख्या शहरातून चालविले जात असल्याची माहिती ब्रिटनमधील एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे. भारतीय तपास यंत्रणांनी याचा तातडीने इन्कार केला असला तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी टोळ्यांनी भारतात आपले बस्तान बसविले आहे; हे निश्चित आहे. दहशतवादाचा प्रचार, प्रसार करण्याबरोबरच प्रत्यक्ष दहशतवादी हल्ल्यांना अंजाम देण्यासाठीही दहशतवादी संघटना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढचा धोका आधीच ओळखण्यात आणि तो नष्ट करण्यास भारतीय तपास यंत्रणा सक्षम आहेत काय; हाच कळीचा मुद्दा आहे.

कल्याण येथून पसार होऊन थेट संपूर्ण जगाला डोकेदुखी ठरलेल्या इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी टोळीत सहभागी झालेल्या तरुणांपैकी आरीफ माजीदला ताब्यात घेण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश मिळाले आहे. त्यानेही ‘मेहदी मेहबूब बिस्वास’ या खोट्या नावाने चालविल्या जाणा-या या ट्विटर खात्यावरील मजकूर वाचून, पाहून आपण प्रभावित झाल्याचे तपासात मान्य केले आहे. या खात्याद्वारे इस्लामी राज्याच्या संकल्पनेचा प्रसार करण्याबरोबरच इसिसच्या दहशतवादी कारवायांचे व्हिडीओ देखील या खात्यावरून प्रसारित केले जात असत. सुमारे वर्षभर सुरू असलेले हे खाते आता बंद करण्यात आले असले तरीही या खात्याद्वारे दहशतवादी संघटनांसाठी युवकांची प्रत्यक्ष भरती करण्याबरोबरच या घातपाती चळवळीला हजारो सहानुभूतीदार जमा करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

दहशतवादाच्या प्रचार, प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे हे काल – परवा उघड झालेले एक ताजे उदाहरण आहे. यापूर्वी देखील अनेक दहशतवादी कृत्यांच्या आखणी, नियोजनात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे उघडकीला आले आहे. पुणे, बंगळुरू, हैदराबाद अशा अनेक बॉम्बस्फ़ोटाच्या नियोजन आणि अंमलबजावणीत आधुनिक संपर्क यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यांच्या तपासाबाबत तपास यंत्रणा अजूनही अंधारात चाचपडत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावरील नियंत्रण हे तपास आणि सुरक्षा यंत्रणांसमोरील मोठे आव्हान आहे.

सध्याच्या कळत माहिती तंत्रज्ञानाने मानवी जीवनात क्रांती घडवून आणली असल्याने सध्याच्या युगाला ‘इंटरनेट युग म्हटले जाते. या माहिती तंत्रज्ञानाच्याच जोरावर भारत जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहे. मात्र दहशतवादी आणि गुन्हेगारही या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करीत आहेत. सुरक्षा यंत्रणांसमोर ही बाब एक मोठे आव्हान बनून राहिली आहे. उदाहरणार्थ पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटाचे संपूर्ण नियोजन आणि संचालन मोबाईलवरून इंटरनेट सुविधा प्रदान करणा-या एप्लिकेशनद्वारे करण्यात आले. यावर नियंत्रण कसे ठेवणार हा सुरक्षा यंत्रणांसमोर यक्ष प्रश्न आहे. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ नंतर मोबाईल हे सहज उपलब्ध होणारे आणि अत्यंत स्वस्तात वापरता येणारे साधन बनले आहे. आता तर स्मार्ट फोन्सही सार्वत्रिक झाले आहेत. या फोनवरून इंटरनेट कोणालाही कुठेही वापरता येते. ज्या गावात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचलेली नाही; अशा दुर्गम ठिकाणीही मोबाईलवर इंटरनेट उपलब्ध असते. या एवढ्या जंजाळावर नियंत्रण ठेवणे सध्या तरी तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांना अशक्य आहे.

पोलादी भिंतीआडचा चीनच नव्हे तर व्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणा-या अमेरिकेतही प्रत्येकाचा व्यक्तिगत ई मेल अथवा एसएमएस सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून जात असतो. मोबाईल अथवा संगणकावरून होणा-या संशयास्पद किंवा आक्षेपार्ह संवाद अथवा माहितीच्या आदान प्रदानावर सुरक्षा यंत्रणांची नजर असते. त्यामुळेच ट्विन टोवर्सवरील हल्ल्यानंतर पुन्हा दहशतवादी हल्ला अमेरिकेत झाला नाही. भारतात मात्र ही यंत्रणा उभारण्यासाठी हजारो कोटीचा निधी आणि तज्ज्ञ मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. याशिवाय गुप्तचर यंत्रणा, तपास यंत्रणा, स्थानिक पोलीस यांच्यात समन्वयाच्या अभावाचे जुने दुखणे तपास यंत्रणांना जडलेले आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी सुस्पष्ट सूचना देऊनही संपूर्ण देशाला वेठीस धरणारा २६/११ चा दहशतवादी हल्ला रोखणे किंवा किमान नियंत्रित करणे कोणत्याही शासकीय सुरक्षा यंत्रणेला शक्य झाले नाही.

Leave a Comment