केईएमच्या महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

kem-hospital
मुंबई – एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना परेलच्या केईएम रुग्णालयात घडली आहे. पोपट भोवारे (३८) असे या वॉर्डबॉयचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोपट भोवारेने बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जुन्या केईएमच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये कोणी नसल्याची संधी साधून महिला डॉक्टरवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पिडित महिला डॉक्टर नेफ्रॉलॉजी विभागात काम करतात. तळमजल्यावरील रुग्णांना तपासल्यानंतर महिला डॉक्टर साडेबारा वाजता लिफ्टने तिस-या मजल्यावरील आपल्या कार्यालयात जात होत्या. लिफ्टमध्ये महिला डॉक्टर, रुग्णांचे दोन नातेवाईक आणि आरोपी होता. रुग्णांचे नातेवाईक पहिल्या मजल्यावर उतरल्यानंतर लिफ्टमध्ये आरोपी आणि महिला डॉक्टरच होते. पहिल्या मजल्यावर लिफ्टचे दरवाजे बंद होताच आरोपीने महिला डॉक्टरवर झडप घातली.

तिस-या मजल्यावर लिफ्टचे दरवाजे उघडताच महिला डॉक्टराने स्वत:ची सुटका करुन घेतली आणि आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी पाय-याजवळ थांबलेले रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरच्या मदतीला धावून गेले. त्यांनी पोपटला पकडले आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी पोपट भोवारेला चोप देण्यात आला. पोपटने विनयभंग केल्याची कबुली दिली आहे असे पोलिसांनी सांगितले. ३५४ आणि ३२१ कलमातंर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment