‘मेट्रो-३’साठी विशेष समितीची स्थापना

metro
मुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) या विशेष समितीची स्थापना कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-३ मार्गासाठी करण्यात आली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिका-यांची नेमणूक या समिती अंतर्गत करण्यात आली असून या समितीद्वारे मेट्रो-३ बाबतचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने एमएमआरसीएलने मेट्रो-३ साठी सर्वसाधारण सल्लागाराची नेमणूक केली आहे. ‘एकॉम एशिया कंपनी’च्या कन्सोर्शियमची सर्वसाधारण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो-३ मार्गात अडथळे येऊ नयेत यासाठी मेट्रो- ३ साठी सर्वसाधारण सल्लागार नेमण्यात आला आहे. याबाबत एमएमआरसीएलची नुकतीच संचालक मंडळाची बैठक पार पडली. एकॉम एशिया हाँगकाँग कंपनीच्या कन्सोर्शियमची निवड करण्यात आली असून या कंपनीअंतर्गत जपानची पडेको, अमेरिकेची एलबीजी इन्क आणि फ्रान्सच्या एजीस रेल या कंपन्यांचा कन्सोर्शियममध्ये सहभाग असेल. सर्वसाधारण सल्लागार कंपनी आराखडा, देखभाल, दर्जा नियंत्रण, सुरक्षा, कंत्राटदार व्यवस्थापन कार्यामध्ये सहकार्य करेल, असे एमएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी म्हणाले.