तंबाखूवर निर्बंध हवेतच

tobacco
आपल्या देशात तंबाखूचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. या बाबत चीन आणि अमेरिकाही आपल्या बरोबर आहेत. त्याला काही कारणे आहेत. चीनमध्ये ५५ टक्के लोक सिगारेट ओढतात. तिथे दर दोन माणसामागे एकजण धूम्रपी आहेच. तिथल्या सरकारने त्यावर बंधने आणण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यात काही यश आले नाही. तसा तिथे तंबाखूचा इतर मार्गांनी फार कमी वापर होतो. म्हणजे गुटखा, जर्दा, मिश्री, तपकीर, या स्वरूपात किंवा केवळ चोळून खाण्यासाठी तिथे तंबाखू कमी वापरली जाते त्यामुळे चीनचा तंबाखूचा एकूण वापर कमी असला तरीही तिथले सिगारेट ओढण्याचे प्रमाण फार आहे. अमेरिकेत हे प्रमाण जास्त असण्याचे एक कारण म्हणजे तिथे महिलाही जवळजवळ पुरुषांच्या बरोबरीने धूम्रपान करीत असतात. त्यामुळे तिथे धूम्रपानाचे प्रमाण एकुणात वाढलेले दिसते. भारतात महिला साधारणत: सिगारेट ओढत नाहीत. ग्रामीण भागात शंभरात एखादी महिला विडी ओढते. काही महिला तपकीर ओढतात. काहींना केवळ तंबाखू खाण्याची सवय असते पण बहुतेक महिलांत मिश्रीचा वापर मात्र सरसकट होतो. परिणामी आपल्या देशात तंबाखूचा वापर वाढलेला दिसतो आणि त्याचे दुष्परिणामही जाणवतात.

अमेरिकेत तंबाखूचे परिणाम जाणवायला लागले तसा तिथल्या सरकारने त्याच्या विरोधात मोठाच प्रचार केला. त्याचा काही प्रमाणात परिणामही झाला. पण फार कमी. भारतात तर कसलाच परिणाम होत नाही. व्यसनांच्या बाबतीत आपला देश लवकर सावध होत नाही. कितीही प्रसार करावा तर फार सावकाशीने लोकांना त्याचे महत्त्व पटते. तंबाखूच्या बाबतीत तर आनंदी आनंद असतो. बहुसंख्य लोक तंबाखूला व्यसनच मानायला तयार नसतात. भारतीय लोकसंख्येचा मोठा भाग शेती व्यवसायात गुंतलेला असतो. तेव्हा शेतात जगापासून दूर राहणारा एकाकी शेतकरी किंवा शेतमजूर हा एकाकीपणा घालवण्यासाठी तंबाखूला जवळ करतो. ते आवश्यकच मानले जाते. त्यात काही गैर आहे असे आपल्याला वाटतच नाही. एकाकी पणा असतो हे म्हणणे ठीक आहे. त्यातून एखादा नाद असावा हेही म्हणणे समर्थनीय आहे पण एकाकीपणा घालवण्यासाठी तंबाखूचेच व्यसन करण्याचा शोध कोणी लावला हे काही माहीत नाही. हे व्यसन शेतकर्‍याचे एकाकीपण सुसह्य करीत असेलही पण त्यामुळे आपल्या आरोग्यावर किती घातक परिणाम होत असतात याची जाणीव या लोकांना नसते.

परिणामी तंबाखूचे व्यसन वाढत जाते. कालांतराने गालावर आतल्या बाजूला चट्टे पडणे. श्‍वासात अडचणी येणे तसेच रक्तदाब वाढणे अशा अनेक तक्रारी सुरू होतात. तंबाखूच्या सेवनातून कर्करोग होतो. असा कर्करोग होऊन मरणारांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. सरकारने तंबाखूच्या विरोधात अनेक उपाय योजिले आहेत कारण एकूणच जगात तंबाखू विरोधी वातावरण तयार होत आहे. जागतिक संघटनांच्या पातळीवर तंबाखूचा वापर रोखण्यासाठी अनेक ठराव होत आहेत आणि जगाला तंबाखूपासून मुक्त करण्यावर सर्वांचा जोर आहे. भारतात त्यावर काही काम होत आहे पण ते अर्धवट आहे. तंबाखू म्हणजे तंबाखू. ती सिगारेटमध्ये घालून ओढली काय की नुसती चोळून खाल्ली काय ती आपल्या आरोग्यावर काही ना काही परिणाम करून जाणारच असते. पण आपल्या सरकारचा सारा भर सिगारेटवर असतो. आता सरकारने सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा अधिक ठळकपणे छापण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे आणि लहान मुलांना सहजा सहजी सिगारेट खरेदी करण्याचा मोह होऊ नये यासाठी सुटी सिगारेट विकण्यास बंदी घालण्याचेही ठरवले आहे. हा निर्णय योग्यच आहे पण केवळ सिगारेटवर असे निर्बंध लादण्याने तंबाखूचा वापर कमी होईल का ?

भारतात तरी तसे शक्य होत नाही. कारण एकूण तंबाखूच्या सेवनात भारतात सिगारेटचे प्रमाण कमी आहे. तंबाखू चोळून खाण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. विड्याही मोठ्या प्रमाणावर ओढल्या जातात. पण तंबाखू म्हणून जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले जातात ते प्रामुख्याने सिगारेटवर असतात आणि आपण ते तसेच भारतात अंमलात आणतो. त्यामुळे सिगारेटवर काही प्रमाणात बंधने आली तरीही तंबाखूचा एकुण वापर कमी होत नाही. गेल्या २० वर्षात भारतात एवढे लोक तंबाखूने मेले आहेत की भारतात ते माणसांच्या मृत्यूचे पहिल्या चार मोठ्या कारणातले एक कारण ठरले आहे. मुलांना सिगारेट ओढण्यापासून परावृत्त करण्यासाठी काही निर्बंध लादले तरीही या मुलांना तंबाखू कोठेही सहजतेने मिळते. ग्रामीण भागात एखादा मुलगा तंबाखू खायला शिकला तर त्याला घरात कोणी रागावत नाही कारण काही ठिकाणी तर मुलगा तंबाखू खात नसेल तर त्याला चार लोकांत मिसळायला कसे येईल याची चिंता केली जाते. तंबाखू हे जणू जनसंपर्काचे साधन आहे. सरकारला खरेच देशाला तंबाखूच्या दुष्परिणामांपासून वाचवायचे असेल तर मुळात तंबाखूच्या लागवडीलाच बंदी घातली पाहिजे. एका बाजूला तंबाखूची लागवड उघडपणे होत आहे आणि सरकार दुसर्‍या बाजूला तिच्यापासून तयार होणार्‍या उत्पादकांवर मात्र निर्बंध घालण्याचा आटापिटा करीत आहे. हा आटापिटा व्यर्थ आहे.

Leave a Comment