
मुंबई – भाजप व शिवसेना हे दोन मित्रपक्ष आज राज्याच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधी पक्षात आहेत. मात्र, भाजप व शिवसेनेच्या संभाव्य युतीबाबत भाजपने प्रयत्न केल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसापासून येत आहेत. भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप-सेनेला एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. यावर शिवसेनेने आजच्या सामनात अग्रलेख लिहून ज्यांनी महाराष्ट्रावर आत्मक्लेशाची वेळ आणली त्यांनी यापुढे शिवसेनेकडे आशेने पाहू नये, असा निर्वाणीचा इशारा देत शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत जाण्यास रस नसल्याचाच निरोप दिला आहे. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र, कदाचित सामनातील भूमिकेनंतर भागवत यांनी मुंबई दौरा रद्द केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भागवत सध्या बंगलोरमध्ये असून आता ते थेट दिल्लीला जाणार आहेत.
