डेंगीच्या डासांची पैदास बेवारस वाहनांमुळे होण्याची शक्यता

dengue
मुंबई – रस्त्यांवर उभ्या केलेल्या बेवारस वाहनांत अवकाळी पावसामुळे पाणी साठून डेंगीच्या डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने अशा वाहनांची तपासणी सुरू केली आहे. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी रस्त्यांवर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांत साचण्याची शक्यता आहे. डेंगी पसरवणार्याी डासांच्या अळ्या स्वच्छ पाण्यात वाढतात. या डासांची अंडी पाण्याशिवाय वर्षभर जिवंत राहू शकतात. त्यामुळे बेवारस वाहनांत साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची पैदास होण्याची शक्यता महापालिकेने लक्षात घेऊन तपासणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे चेंबूर येथील नगरसेवक अनिल त्रिंबककर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महापालिकेने यापूर्वी केलेल्या पाहणीत बेवारस वाहनांत डेंगीच्या डासांच्या अळ्या सापडल्या होत्या. झोपड्यांवर टाकलेले प्लॅस्टिक, टाकाऊ टायर आणि प्लॅस्टिक किंवा थर्माकोलच्या फेकून दिलेल्या ग्लासांतही डासाच्या अळ्या सापडल्या होत्या.

Leave a Comment