अभिजित गुहांची युनोच्या उच्चस्तरीय समितीमध्ये नियुक्ती

uno
संयुक्त राष्ट्रसंघ – भारतीय लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल अभिजित गुहा यांची युनोच्या शांतता अभियानाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस बान की मून यांनी नियुक्ती केली आहे.

संयुक्त राष्ट्र संघाचे वेगवेगळ्या प्रकारचे अभियान आणि भविष्यातील गरजांचा ही समिती आढावा घेणार आहे. युनोच्या पुढील वर्षी होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत या समितीचा अहवाल सादर केला जाईल. याशिवाय ही समिती संघर्षातील प्रकृतीमध्ये होत असलेला बदल आणि शांतता सेनेच्या अभियानांची क्षमता व कामगिरीवर नजर ठेवेल, असे बान की मून यांनी १४ सदस्यीय समितीची घोषणा करताना सांगितले. शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते पूर्व तिमोरचे माजी राष्ट्रपती जोस रॅमोस होर्टा हे या समितीचे अध्यक्ष असतील.

तोपची रेजिमेंटशी संबंधित असलेले लेफ्टनंट जनरल गुहा यांना अतिविशिष्ट सेवा मेडल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि सध्या ते युनोच्या शांतता विभागात औद्योगिकविषयक तज्ज्ञांच्या समितीमध्ये आपली सेवा देत आहेत. गेल्या जून महिन्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या ६९ पैकी ४३ शांतता अभियानांमध्ये सुमारे १.७० लाख सैनिकांना पाठविले आहे. इतर देशांपेक्षा या अभियानांमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे.