पवारांचा केविलवाणा डाव

pawar
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे राजकारणात डावपेच खेळण्याच्या बाबतीत फार नावाजले जातात. काही अंशी नव्हे तर बर्‍याच अंशी ते खरेही आहे. परंतु त्यांच्या हाती सत्ता असते किंवा निर्णायक बळ असते तेव्हा त्यांच्या डावपेचाला यश येते आणि त्या डावपेचांची दखल घेतली जाते. परंतु जेव्हा अशी अनुकूल परिस्थिती नसते तेव्हा त्यांचे डावपेच हास्यास्पदही ठरतात आणि केविलवाणे ठरतात. आता त्यांनी भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठींबा जाहीर केला आहे. भाजपाने पाठींबा न मागताच तो दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन भाजपाला बाहेरून पाठींबा देण्याची घोषणा केली. खरे म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीचे पुनरुज्जीवन होऊ शकते आणि तोच सत्तेचा सरळ मार्ग आहे. पण या नैसर्गिक युतीतल्या शिवसेनेचे नेते, निमंत्रण तर येऊ द्या मग पाठिंब्याचे बघू अशी भूमिका घेत आहेत. पण राष्ट्रवादीने मात्र स्वत:च पाठींबा जाहीर करून टाकला. आता याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका योग्य की राष्ट्रवादीची भूमिका योग्य यावर चर्चा होत राहील, पण पवारांची चाल राजकारणात कशी असते याचे दर्शन जरूर घडलेले आहे. राज्याच्या विधानसभेची अवस्था त्रिशंकू झाली आहे ही गोष्ट खरी; पण राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल अशी काही स्थिती नाही. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्याला स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून भारतीय जनता पार्टीला सरकार स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठींबा देण्याची घोषणा केली.

खरे म्हणजे राष्ट्रवादीच्या पाठींब्याचा आणि राजकीय स्थैर्याचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादीने पाठींबा दिला म्हणून भाजपाचे प्रस्तावित सरकार स्थिर होणार आहे आणि पाठींबा दिला नाही म्हणून ते अस्थिर होणार आहे अशी काही स्थिती नाही. परंतु शरद पवार यांनी केवळ स्वार्थासाठी म्हणून भाजपाला एकतर्फी पाठींबा जाहीर केला आहे आणि त्यातला स्वार्थ लोकांना कळू नये म्हणून स्थैर्याचा बुरखा त्या पाठिंब्यावर पांघरला आहे. त्यांचा खरा हेतू अजित पवार आणि सुनील तटकरे या दोघांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये हा आहे. या दोघांनीही राज्याच्या सिंचन प्रकल्पाच्या कामात भरपूर भ्रष्टाचार केलेला आहे. परंतु ते सत्तेवर असल्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी रोखणे त्यांना शक्य झाले. हे दोघेही मंत्री असल्यामुळे त्यांना चौकशी आणि खटल्यांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळाले. सरकारही त्यांचेच असल्यामुळे सारे निर्णय त्यांच्या सोयीने झाले. पण आता त्यांचे सरकार जाता जाता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी या दोघांवर खटले भरण्याची अनुमती मागितली होती. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी सत्तेचा वापर करून अशा कारवाया टाळल्या. तशी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी आदर्श घोटाळ्याच्या प्रकरणात दिलीच आहे. तसाच प्रकार अजित पवार आणि तटकरे यांच्या चौकशीचाही होता.

आता मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेबाहेर फेकला गेला आहे आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीपासून पवार-तटकरे यांना संरक्षण देणारी कवचकुंडले आता राहिलेली नाहीत. शिवाय आपण सत्तेवर आल्यावर अजित पवारांना तुरुंगात टाकू अशी उघड भाषा बोलणार्‍या भाजपा नेत्यांच्या हातात सत्ता आली आहे. त्यामुळे पवार-तटकरे यांच्याविरुद्धची कारवाई अटळ आहे. ती टळावी अशीच पवारांची इच्छा असणार आणि त्यापोेटीच पाठींबा दर्शवून सत्तेत येऊ पाहणार्‍या सरकारवर एक वेगळे दडपण ते आणत आहेत. मात्र यातून शरद पवार यांच्या राजकारणाची जातकुळी लक्षात आली आहे. पवारांना राजकारण खेळताना तत्वाच्या गप्पा मारायला बर्‍या वाटतात. परंतु स्वार्थाचा विचार समोर आला की त्यांना तत्वाचा विसर पडतो. किंबहुना ते आधी स्वार्थासाठी म्हणून राजकारण करतात आणि नंतर त्या राजकारणाला तात्विक मुलामा देतात. कॉंग्रेसशी हातमिळवणी करताना त्यांनी त्या हातमिळवणीला, जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केलेली सेक्युुुलर युती असा तात्विक मुलामा दिला होता. आता त्याच जातीयवादी शक्तीशी ते हातमिळवणी करायला निघाले आहेत.

जातीयवादी शक्ती देशात वाढत चालल्या आहेत असा अनेकदा इशारा देणारे शरद पवार आणि अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात सत्ता देणार का, असा प्रश्‍न विचारणारे शरद पवार आता स्वत:च या जातीयवादी शक्तीची सत्ता स्थिर व्हावी म्हणून पुढे सरसावले आहेत आणि अर्ध्या चड्डीवाल्यांना आपला कथित जातीयवादी अजेंडा अंमलात आणता यावा यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याकरिता आपल्या हातातली शक्ती वापरत आहेत. शेवटी शरद पवार यांच्या पक्षाचे धोरण काय? त्याची तत्वे कोणती? याचा कधी पत्ताच लागत नाही. त्यांचा राजकारणातला प्रवास नेहमीच उलटा असतो. आधी सत्ता हस्तगत करा, नंतर त्याला काय नाव द्यायचे हे ठरवा असा त्यांचा खाक्या असतो. आता भाजपाच्या पाठीशी उभे राहून ते आधी सत्ता मिळविणार आहेत किंवा बाहेरून पाठींबा देऊन, एकतर्फी समर्थन करून नवे समीकरण तयार करणार आहेत आणि त्याला विकासासाठी आवश्यक असे परिवर्तनवादी समीकरण असे काही तरी नाव देणार आहेत. एकंदरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेशिवाय जगू शकत नाही. आता हातून सत्ता जाणार अशी चाहूल लागताच अनेक नेते बाहेर पडले. आता तर काय हातातली सत्ता गेलीच आहे. तेव्हा पक्ष टिकेल का नाही हा प्रश्‍न आहे. सत्तेचा डिंक असल्यािशवाय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाला चिटकून बसतच नाहीत. कारण या पक्षामध्ये तत्वापेक्षा सत्तेला आणि सत्तेपासून मिळणार्‍या लाभाला महत्व आहे.

Leave a Comment