मुंबईत उद्या एकाच वेळी २२७ ठिकाणी सार्वत्रिक श्रमदान

mumbai
मुंबई – केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणा-या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आता मुंबई महापालिकेने देखील स्वच्छता उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानांतर्गत मुंबईकर नागरिकांच्या सहभागाने दर शनिवारी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत महापालिकेच्या २२७ नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी एका ठिकाणी या पद्धतीने एकाचवेळी २२७ ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्याचा उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

`स्वच्छ भारत – स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ अंतर्गत मुंबई महापालिकेच्या सर्व कार्यालय व आस्थापनांतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी दर शुक्रवारी सायंकाळी ५.३० ते ७.३० यारितीने दर आठवड्यात दोन तास श्रमदानातून आपापले कार्यालय व परिसराची स्वच्छता करण्याची सुरुवात झाली आहे. प्रत्येक नागरिकाने देखील आठवड्यातून दोन तास आणि वर्षातून शंभर तास श्रमदानातून स्वच्छता करणे स्वच्छ भारत अभियानात अपेक्षित आहे. म्हणून नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेत त्याची व्यापकता प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचावी यासाठी महापालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे. दर शनिवारी होणा-या श्रमदान कार्यक्रमांच्या स्थळांची यादी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या होणा-या मुंबईतील २२७ नगरसेवकांच्या प्रभागात एकाचवेळी करण्यात येणा-या श्रमदानाशी संबंधित स्थळांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईकर नागरिकांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, त्यांनी श्रमदानातून या स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि स्वच्छ व सुंदर मुंबई साकारण्याच्या महत्वाकांक्षी उपक्रमास हातभार लावावा.