मोनोव्हील रुग्णवाहिका उपक्रम भागीदारी तत्त्वावर राबवा – उच्च न्यायालय

highcourt
ठाणे – ठाणे जिल्ह्यात व राज्यात विशेषतः पावसाळ्यात सर्पदंशामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतात. हे मृत्यू टाळण्यासाठी क्रायसिस फाऊंडेशनच्या वतीने मोनोव्हील रुग्णवाहिका विकसित करण्यात आली होती. राज्यात व देशात सर्पदंशामुळे होणा-या मृत्यूची आकडेवारीही फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केली होती. त्या पार्श्वभूमीवर सर्पदंश होणा-यांना तात्काळ उपचार मिळावेत आणि उपचार मिळेपर्यंत प्रथमोपचार व्हावेत, यासाठी ठाण्याच्या क्रायसिस फाऊंडेशनच्या सहकार्याने मोनोव्हील रुग्णवाहिकेचे सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या तत्त्वावर उत्पादन व वितरण करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरोग्य विभागाला दिले आहेत. यासाठी न्यायालयाच्या वतीने जमशेद मेस्त्री यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे आणि पी.डी. कोदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील संशोधनात फाऊंडेशनच्या वतीने अपूर्वा आगवण, डॉ. सरिता पारीख, क्लोरा कोपील आणि ग्लेन फर्नांडिस यांनी सहभाग घेतला होता. सर्पदंश झालेल्या रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवू शकण्यास उपयुक्त ठरेल, अशी ही मोनोव्हील यंत्रणा आहे. विषारी सर्पाने दंश केल्यावर उपचारासाठी या मोनोव्हीलवर मानवी(मॅन्युअल) व स्वयंचलित (ऑटोमेटिक) अशा दोन्ही स्वरूपाच्या व्हेंटिलेटरची सोय आहे. या व्हिलसोबतच सापाला पकडण्यासाठीचा ट्रॅप, विशेष बूट व पिनॉक ही आयुर्वेदिक गोळी या किटचा देखील समावेश आहे.

Leave a Comment