
कराची – पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीमुळे टिकेचा सामना करत असलेल्या कर्णधार मिस्बाह उल हकला अजून एक मोठा धक्का बसला आहे. कराराची रक्कम न भरल्यामुळे फेडरल ब्यूरो ऑफ रेवेन्यूने मिस्बाहचे बॅंकेचे खाते बंद केले आहे. मिस्बाहने ३९ लाख रूपयांचा कर न भरल्यामुळे एफबीआरने त्याचे बॅंकेचे खाते बंद केले आहे. त्याच्याव्यतिरिक्त पाकिस्तान कसोटी संघाचा अन्य एक खेळाडू अजहर अलीचे देखील बॅंकेचे खाते बंद करण्यात आले आहे. मिस्बाहच्या मते, त्याचे आणि कर विभागाचे कराच्या रक्कमेबाबत विवाद आहेत. त्यामुळे त्याने कर भरला नाही. एफबीआरचे प्रवक्ता शाहिद हुसैन यांनी सांगितले की, अजहर आणि मिस्बाह यांचे बॅंकेचे खाते बंद करण्यात आले आहे. जर त्यांच्या खात्यात कराराची रक्कम असेल तर, ती त्यांच्याकडून वसूल करण्यात येर्इल. मिस्बाहला कर विभागास ३९ लाख रूपये तर, अजहरला १५ लाख रूपयांचा कर भरायचा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. बोर्डाने सांगितले की, वकील हे प्रकरण बघतील. असे असूनही कराची रक्कम न भरण्यात पाकिस्तान संघाचे अन्य खेळाडू देखील मागे नाहीत. मोहम्मद हफीज आणि उमर अकमल यांची देखील विचारपूस करण्यात येत आहे.
