पिझ्झा हटला महागात पडले ‘पिंक फॅट लेडी’ म्हणणे

pizza-hut
सिंगापूर – पिझ्झा घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या एका महिलेचे वर्णन पावतीवर ‘पिंक फॅट लेडी’, असे केल्याप्रकऱणी सिंगापूरमधील पिझ्झा हट कंपनीला दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणी तपासदेखील सुरू केल्याचे म्हटले आहे. एली सि असे त्या महिलेचे नाव असून, तिने सिंगापूर पिझ्झा हटच्या फेसबूक पानावर ‘पिंक फॅट लेडी’ असे वर्णन केलेल्या पावतीचे छायाचित्र पोस्ट केले आहे. सिंगापूरमधील पिझ्झा हटमध्ये सि या पिझ्झा घेण्यासाठी गेल्या होत्या. तेथे पिझ्झाबाबतच्या पावतीवर त्यांचे वर्णन ‘पिंक फॅट लेडी’ असे करण्यात आले होते. पिझ्झा देणा-या व्यक्तीला सि यांना ओळखता यावे, म्हणून पावतीवर असे वर्णन करण्यात आले होते.

सि यांनी पिझ्झा कंपनीच्या फेसबूक पानावर लिहिले आहे की, पावतीवरील वर्णन वाचल्यानंतर मला अपमानित झाल्यासारखे वाटले. एक ग्राहक म्हणून मला तुमच्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा होती. पिझ्झा हट कंपनी आणि कर्मचा-यांकडून झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली जाईल, अशी मला आशा आहे. जाड असण्यात चूक काय आहे?, मी ग्राहक आहे आणि मी पिझ्झाचे पैसे देत आहे. मला काय पिझ्झा फुकट मिळणार नव्हता, असे सि यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रकारानंतर पिझ्झा हटने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणी आपण तपास सुरू केल्याचे म्हटले आहे. पिझ्झा हटच्या व्यवस्थापकाद्वारे साक्षांकित करण्य़ात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, उद्योग जगतातील नियमांचे उल्लंघन करणारे हे प्रकरण आहे. नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारचे वर्तन आम्ही कधीच माफ कऱणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment