निवडणूकीसाठी राबणा-या शिक्षकांना उद्या सुटी

techers
मुंबई – निवडणुकीसाठी सलग ३६ तास राबणा-या शिक्षकांना अखेर दिलासा मिळाला आहे. उद्या (गुरुवार) राज्यातील शिक्षकांना सुट्टी मिळणार असून हा दिवस सेवाकाल म्हणून धरला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या १५ नोव्हेंबर १९९४च्या निर्देशानुसार निवडणुकीच्या मतदानाच्या दुस-या दिवशी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची गैरहजेरी मान्य करून तो दिवस सेवाकाल धरण्याबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेश आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मतदानानंतरच्या दिवशी शिक्षकांना रजा मिळावी, या मागणीसाठी शिक्षक आमदारांसह सर्वच शिक्षक संघटना आणि प्रशासन यांच्यात खडाजंगी सुरू होती.

विधानसभा निवडणुकीसाठी शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निवडणूकीच्या कर्तव्यावर आहेत. मात्र हे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शालेय कामकाज आणि निवडणुकीचे कामकाज यामुळे प्रचंड तणावाखाली काम करीत आहेत. त्यात त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रे व अन्य साहित्य जमा करण्यासाठी होणारा रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते. यामुळे १६ ऑक्टोबर रोजी त्यांना आपल्या नियमित कामाच्या ठिकाणी अनुपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी आणि या दिवसाची अनुपस्थिती सेवाकाल म्हणून गृहित धरण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार व शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. १५ नोव्हेंबर १९९४च्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना देण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी दिली असून त्यामुळे जे सरकारी अधिकारी अथवा शिक्षक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी १६ ऑक्टोबर रोजी कामावर जाण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी यावेळी दिली.

Leave a Comment