ग्राहक मंचाचा ‘एलजी’ कंपनीला दणका

lg
मुंबई – एलजी कंपनीच्या मायक्रोवेव्ह अवघ्या काही दिवसांत बिघडल्यामुळे संबंधित ग्राहकाला १० टक्के व्याजासह मशिनची रक्कम परत करण्याचे आदेश नुकतेच वांद्रे येथील ग्राहक तक्रार मंचाने दिले आहेत.

चेंबूर येथील निलिमा रिपोटे यांनी ‘सुमारिया अप्लायन्सेस’ व एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’ विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्याने मंचाचे अध्यक्ष एस. एस. व्यवहारे व सदस्य एस. व्ही. कलाल यांच्या खंडपीठापुढे हा निर्णय दिला.

रिपोटे यांनी एप्रिल २०१३मध्ये सुमारिया अप्लायन्सेसकडून ७,३०० रुपयांना ‘एलजी’चा मायक्रोवेव्ह मशिन विकत घेतली होती. त्यानंतर मशिनचा वापर करण्यासाठी प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी कंपनीने त्वरित तंत्रज्ञ पाठविला नव्हता. त्यामुळे रिपोटे यांनी दोन महिने मायक्रोवेव्ह मशिन तशीच ठेवली होती. तब्बल दोन महिन्यांनी कंपनीने तंत्रज्ञ पाठवला. त्याने सिलबंद बॉक्स उघडून मशिन चालू केली. मात्र, सुरू झाल्यानंतर ती काही सेकंदातच बंद पडली.
त्यानंतर तंत्रज्ञाने काही भाग सदोष असल्याने सांगून ते बदलावे लागतील, असा अभिप्राय दिला. त्याबद्दल तक्रारदाराने दुकानदाराकडे दाद मागितली असता तब्बल चार महिन्यांनी मेकॅनिक पाठविण्यात आला होता. त्यानेही मशिनमध्ये मोठा दोष असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तक्रारदाराने संपूर्ण रक्कम १६ टक्के व्याजासह परत मिळावी, अशी मागणी दुकानदाराकडे केली.त्यावर दुकानदाराने प्रतिसाद दिल्याने रिपोटे यांनी वकिलामार्फत नोटीस दिली होती. दुकानदाराकडे दाद मागूनही मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. त्यानुसार झालेल्या सुनावणी दरम्यान मंचाने हा निकाल दिला आहे.

Leave a Comment