मनसेचे सुधाकर खाडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

mns
मुंबई – सांगलीतील कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुधाकर खाडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदा पुन्हा खाडे यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. त्यामुळे अटक होण्याची शक्यता असल्याने खाडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सुधाकर खाडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

निवडणुकीचा अर्ज भरल्यापासून विरोधक आपल्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. तेव्हा यात अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी खाडे यांनी केली. न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली. त्यांनी खाडेंना २० हजारांचा जामीन मंजूर केला. खाडे यांच्याच संदर्भात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘किमान निवडणुकीनंतर बलात्कार करायचा’, असे उपरोधिक वक्तव्य केल्यानंतर पाटील यांनी याविषयी दिलगिरीही व्यक्त केली होती.

Leave a Comment