सेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे परस्परांविरोधात गुन्हे दाखल

combo
ठाणे – कॅसल मिल येथील एका बंद कंपनीच्या जागेतील झुडपात सापडलेल्या साडेतीन लाख रुपयांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद रंगला आहे. हे पैसे शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फाटक यांनी मतदारांना वाटण्यासाठी आणले होते, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. तर जबरदस्तीने आपल्या मालकीच्या जागेत शिरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारण्याचा प्रयत्न केल्याचा फाटक यांचा आरोप आहे. याप्रकरणी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

कंपनीच्या आवारात असलेल्या एका पूजेसाठी रविवारी रात्री रविंद्र फाटक गेले असता त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५० ते ६० कार्यकर्ते तिथे पोहोचले. मतदारांना पैसे वाटप होत असल्याचे आरोप सुरू झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या झाडीतून साडेतीन लाख रुपये शोधून काढले. मतदारांना भुलविण्यासाठी पैसे वाटप करणाऱ्या फाटक यांच्यावर कारवाईची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच झुडपात पैसे टाकून हे षडयंत्र रचल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिस सविस्तर तपास करत आहेत.

Leave a Comment