निवडणुकीच्या कामावरून शिक्षक विरुद्ध शिक्षक संघर्ष सुरू

election
मुंबई – एकीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा बोझा आणि दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कामात शिक्षकांना जबरदस्तीने गोवण्यात येत असल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. निवडणुकीच्या कामापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शिक्षक आजारीपणाचे कारण पुढे करत आहेत. तर शिक्षकांचा असलेली दुसऱा गट या विरोधात आवाज उठवत आहे. अशाप्रकारे निवडणुकीच्या कामामुळे शिक्षकांमध्ये दोन गट पडले असून वादविवाद सुरू झाले आहे. याविरोधात काही शिक्षकांनी थेट महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांकडे धाव घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

राज्यातील अनेक शिक्षकांना निवडणुक ड्युटी जाहीर झाल्याने अनेक दिवसांपासून याविरोधात शिक्षक आणि शिक्षक संघटना आवाज उठवत आहेत. अनेक शिक्षक स्वखुशीने निवडणूक कामाची जबाबदारी बजावत असतानाही काही शिक्षक मात्र निवडणुकीची कामे रद्द करून घेत असल्याची बाब शिक्षकांनीच उघड केली आहे. यासंदर्भात शनिवारी काही शिक्षकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून ठणठणीत शिक्षकही आजारपणाचे कारण देत निवडणूक काम रद्द करून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शारीरिक व्याधी असलेले तसेच ५० वर्षांवरील शिक्षक निवडणूक कार्यात सहभागी होत आहेत. अनेक शाळांचे मुख्याध्यापक व कॉलेजांचे प्राचार्य-उपप्राचार्यही निवडणूक कामांत सहभागी झाले आहेत, असे असूनही काही शिक्षक निवडणूक ड्युटीतून आपली मुक्तता कशी करून घेऊ शकतात, असा प्रश्न या शिक्षकांनी उपस्थित केला आहे. ज्यांना बोर्डाच्या परीक्षेचे कामही नाही, त्यांचीही निवडणूक ड्युटीतून मुक्तता करण्यात आल्याचेही त्यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणले.

Leave a Comment