सात उमेदवारांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस

vidhansabha
परभणी – परभणी जिल्ह्यातील सात उमेदवारांना पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी बनविण्यात आलेल्या समितीने खुलासा करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. आनंद भरोसे (भाजप, परभणी उमेदवार), प्रताप देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस, परभणी उमेदवार), राहुल पाटील (शिवसेना, परभणी उमेदवार), इरफानुर रहमान (कॉंग्रेस, परभणी उमेदवार), रत्नाकर गुट्टे (रासप, गंगाखेड उमेदवार), मोहन फड (अपक्ष , पाथरीउमेदवार), बालाजी देसाई (मनसे , गंगाखेड उमेदवार) यांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

विविध दैनिकांमध्ये एखाद्या उमेदवाराविषयी प्रकाशित झालेल्या बातम्यांचा अभ्यास केल्यानंतर सर्व बातम्या एकाच स्वरुपाच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीने संबंधित उमेदवारांना या नोटीसा बजावल्या असून, येत्या ४८ तासांत उमेदवारांनी या नोटीसांना उत्तर देणे बंधनकारक असल्याचे समजते. संबंधित उमेदवाराकडून नियोजित वेऴेआधी खुलासा न आल्यास त्या बातम्या म्हणजे त्या उमेदवाराच्या जाहिराती असे समजून त्याचा खर्च उमेदवाराच्या खात्यात लावण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी.सिंग यांनी ही माहिती दिली आहे.