नवमतदारांवर उमेदवारांचे लक्ष केंद्रित

voting
अहमदनगर जिल्ह्यात मतदार नोंदणीची मोहीम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आल्याने १८ ते २२ वयोगटातील तब्बल अडीच लाखाहून अधिक नवमतदार आता प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण मतदारसंख्येपैकी जवळपास ५० टक्के तरूण मतदार असल्याने बहुतेक सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी तरूण मतदारांवर आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात साडेपंधरा लाख युवा मतदार उमेदवारांच्या निवडणूकीचा निर्णय करणार आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणुक अधिकारी अनिल कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या ३२ लाख ३० हजार १४० इतकी आहे. त्यामध्ये १५ लाख ३३ हजार महिला, १६ लाख ९६ हजार ९८३ पुरूष आणि १२६ तृतियपंथी मतदार आहेत. एकूण मतदारांच्या संख्येत २ लाख ६६ हजार २११ इतके नवमतदार आहेत. १८ ते २२ वयोगटातील हे नवमतदार आयुष्यात प्रथमच विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करणार आहेत. तसेच एकूण मतदारांच्या संख्येपैकी सुमारे ५० टक्के म्हणजे १५ लाख ५५ हजार ७३३ मतदार हे १८ ते ३९ या वयोगटातील तरूण मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान भाजपाकडून आणि विशेषः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचाराने तसेच भाजपाच्या हायटेक प्रचाराने बहुसंख्येने युवा मतदार भाजपाच्या बाजुला केली जात आहे. लोकसभा निवडणूकीतील मोदी लाटेच्या प्रभावानंतर राज्यात आता विधानसभाची सार्वत्रिक निवडणुक होत आहे. विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या जाहीर सभांमधून मतदारांवर आश्वासनांची खैरात सुरू केली आहे. मात्र नगर जिल्ह्यात बहुतेक सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या जाहीर सभांना होणारी कर्मी गर्दी राजकीय पक्षांना अंतर्मुख करावयास लावणारी आहे. त्यामुळे कमी गर्दीचे दर्शन होऊन लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी बहुतेक बहुतेक सर्वच पक्ष वरिष्ठ नेत्यांच्या सभा देखील छोट्या मैदानांवर अथवा शहरांमधील छोटे चौक आणि रस्ते अशाच ठिकाणी सभांचे आयोजन केले जात आहे. तरी देखील छोट्या जागेत होणा-या सभांकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध पक्षांचे तरूण उमेदवार ही जमेची बाजू असली तरी सद्यस्थितीत मतदारांना आणि खास करून युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्याच पक्षांकडे विशेष काही कार्यक्रम नसल्याने युवा मतदार देखील पूर्णपणे दूर असल्याचे दिसत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केला तर नव्याने मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क प्रथमच बजावणार असणा-या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. अकोले मतदारसंघात १९ हजार ७२८ नवमतदार आणि एकूण १ लाख १३ हजार १५८ इतके युवा मतदार आहेत. संगमनेरमध्ये नवीन नोंदणी केलेले मतदार २० हजार ७५० असून १ लाख २३ हजार २२५ इतके तरूण मतदार आहेत. शिर्डीमध्ये २३ हजार ७१५ नवीन मतदार आणि १ लाख २६ हजार तरूण मतदार आहे. कोपरगावमध्ये २४ हजार १०३ नवमतदार आणि १ लाख २२ हजार ४९८ तरूण मतदार आहेत. श्रीरामपूरमध्ये २१ हजार २८९ नवीन मतदार आणि १ लाख २५ हजार ४६४ तरूण मतदार असून नेवासा मतदारसंघात १७ हजार २६९ नवीन आणि १ लाख ११ हजार १७९ युवा मतदार आहेत. शेवगावमध्ये २७ हजार २६ नवीन आणि १ लाख ५२ हजार ८४ तरूण मतदार आहेत. तसेच राहुरीत २२ हजार ५१२ नवीन आणि १ लाख २९ मतदार असून पारनेर मतदारसंघात २२ हजार ५०३ नवीन मतदार आणि १ लाख ३७ हजार ७९६ तरूण मतदार आहेत. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात २१ हजार २८८ नव मतदारांनी नोंदणी केली असून पारनेर मतदारसंघात २१ हजार ८९५ नवीन आणि १ लाख ३५ हजार ४५६ तरूण मतदारांची संख्या असून कर्जत-जामखेड मतदारसंघात नवीन मतदार २४ हजार १३४ असून तरूण मतदारांची संख्या १ लाख ३१ हजार ९३७ आहे. २ लाख ६६ हजार २११ नवमतदार आणि एकूण साडे पंधरा लाख तरूण मतदारांना आपल्याकडे आकिर्षत करण्यासाठी बहुतेक सर्वच पक्षांनी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. प्रत्येक मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेणे केवळ असल्याने प्रचार फे-या, खासगी बैठकांच्या बरोबरीने आता सोशल मिडीयावर देखील प्रचार युध्द रंगलेले पहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणूकीचे मतदान अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपलेले असतांना तरूण मतदारांचा कल नेमका कोणाकडे आहे, हे स्पष्ट होत नसल्याने राजकीय पक्षांबरोबरच बहुतेक सर्व उमेदवार देखील संभ्रमात आहेत.

Leave a Comment