भाजपाने घेतला ‘….महाराष्ट्र माझा’ गुंडाळण्याचा निर्णय

bjp
मुंबई – ‘ कुठं नेऊन ठेवलायं महाराष्ट्र माझा’ ही भाजपाची जाहिरात गुंडाळण्याचा निर्णय भाजपा प्रदेश नेतृत्वाने घेतला असून निवडणूक कॅम्पेनिंगमध्ये सदैव आघाडीवर असलेल्या भाजपाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र या जाहिरातींचा फटका बसण्याची चिन्ह लक्षात घेऊन एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे.

मतदारांपर्यंत भाजपाची ही जाहिरात नकारात्मक संदेश पोहोचवित असल्याचे बोलले जात असून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपाच्या जाहिरातीवर टिका करताना महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचा आरोप केला. अन्य पक्षांकडूनही भाजपाच्या या जाहिरातीचा चांगलाच समाचार घेण्यात आला. सोशल मीडियातही भाजपाच्या जाहिरातीचे मोठया प्रमाणात छोटय़ा-छोटय़ा विनोदांमार्फत विडंबन केले जात आहे. एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असताना या जाहिरातींमुळे भाजपा बॅकफूटवर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यापूर्वीच सांगितले होते, की प्रचाराच्या एकूण दिवसांपैकी काही दिवस आधीच्या सरकारने काय दिले आणि पुढचे काही दिवस भाजपा काय करणार, हे जाहिरातीमार्फत दाखविले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.