
चिपळूण – निवडणुकीचा खर्च वेळेवर सादर न केल्याने चिपळूण विधानसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिका-यांनी नोटीस बजावली आहे. कॉंग्रेसच्या रश्मी कदम आणि बहूजन समाज पक्षाचे प्रेमदास गमरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवाराला खर्चाची मर्यादा २८ लाखांपर्यंत आहे. खर्च सादर करणा-या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे शेखर निकम यांनी सर्वाधिक खर्च केला असून, २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान त्यांनी २ लाख ५४ हजार ८१२ रुपये खर्च केले आहेत. त्याखालोखाल शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांनी १ लाख ४३ रुपये खर्च केले आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे माधव गवळी यांनी ९२ हजार ३११ रुपये, रिपब्लिकन सेनेचे सुशांत जाधव यांनी १६ हजार ६१६ रुपये, आरपी कांबळे गटाचे यशवंत तांबे यांनी ११ हजार ३५० रुपये, बहूजन मुक्ती पार्टीचे उमेश पवार यांनी ६ हजार २००, कुणबी सेनेचे गोपीनाथ झेपले यांनी १४ हजार ५५० रुपये आणि अपक्ष उमेदवार संतोष गुरव यांनी १० हजार रुपये खर्च केले आहेत.
