उद्धव ठाकरेंनी केले अमित शहा यांना लक्ष्य

combo
पुणे – ‘डोंगरातला उंदीर शोधायला आलेल्या अफझलखानाचे काय झाले ते उभ्या हिंदुस्थानला माहीत आहे. माझे शिवसैनिक उंदीर नाहीत तर वाघनखं आहेत. विधानसभा निवडणुकीत तुमचा राजकीय कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना दिला आहे. पुण्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ठाकरे यांनी अमित शहा यांना लक्ष्य केले.

ज्या उंदराला वाघ बनविले तोच उंदिर आता त्याच्या करवित्याला खायला निघाला आहे. त्याला त्याची जागा दाखवून द्या, अशा शब्दात अमित शहा यांनी सेनेला टोला हाणला होता. त्यावर शिवसेनेवाल्यांना हिणवणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना प्रत्युत्तर देताना ‘उंदीर कोण हे १९ तारखेला म्हणजेच मतमोजणीच्या दिवशीच समजेल. शहांचे आव्हान महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारले आहे, असे उद्धव म्हणाले. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीकरांपुढे झुकणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान ताठ मानेने जिवंत ठेवेल. या निवडणुकीत छत्रपतींचा आशीर्वाद महाराष्ट्रात कोणाला आहे ते मराठी माणूस देशाला दाखवून देईल,’ असे उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच महायुती का तुटली हे सांगताना ठाकरे म्हणाले, ”दिल्लीत सत्ताबदल झाला. जनतेने राज्यातही सोन्याचे ताट वाढून ठेवले होते. मात्र, भाजपाकडे कोणता चेहरा आहे. दिल्लीच्या नावावर शेपटू हलविणारा मुख्यमंत्री हवा का? आम्हाला या मातीत जन्मलेला, या मातीचा स्वाभिमान असलेला मुख्यमंत्री हवा आहे, असेही उद्धव यावेळी म्हणाले.