अजित पवारांच्या बॅगेत सापडली लाखोची रोकड!

ajit-pawar
परभणी – गंगाखेड परळी चेक नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या जीपमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगेत तब्बल चार लाख ८५ हजार रूपये सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही जीप ताब्यात घेतली असून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अजून याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. ही रक्कम निवडणूक खर्चाची असून ती बाळगण्यात गैर नाही, असा आश्चर्यकारक खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.

या निवडणुकीत थोडी तपासणी कडक करताच ठिकठिकाणी गाड्यांमध्ये मोठ्या रकमा सापडल्याच्या बातम्या रोज येत आहेत मात्र चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाडीत अजित पवारांच्या बॅगेतच पैसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. चेकपोस्ट नाक्यावर जीप क्रमांक एमएच ०९ बी एक्स ५५१० ही आल्यानंतर तिची तपासणी करता एका बॅगमध्ये चक्क चार लाख ८५ हजार रूपये पोलिसांना मिळून आले. या बॅगेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कपडे व कार्ड आढळले. या जीपमध्ये तीन बॅगा होत्या. अन्य बॅगेत अजित पवार यांच्या सहाय्यकाचे कपडे आणि कार्ड आढळले. ही जीप जिंतूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचाराची होती. पोलिसांनी जीप, जीपमधील व्यक्ती यांना ताब्यात घेतले आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिका-यांना कळविण्यात आले असून, चौकशी चालू आहे.

Leave a Comment