
मुंबई- आमचा पक्ष राज्याचे तुकडे करत नाही तर राज्य निर्माण करतो, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विलास मुत्तेमवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन देत असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल निवडणूकीच्या प्रचारसभेत आपण पंतप्रधान पदावर असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेला उल्लू बनविले असल्याचे सांगत कॉंग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर टिका केली होती.
आमचा पक्ष राज्याचे निर्माण करतो : देवेंद्र फडणवीस
मुत्तेमवार यांच्या या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले असून मोदी यांच्या मुंबईबाबतच्या भूमिकेला कॉंग्रेस वेगळा रंग देऊ पाहत असल्याचे सांगितले आहे. या प्रसिद्धीपत्रकात फडणवीस यांनी सांगितले आहे की, एखाद्या फ्लॉप चित्रपटाच्या साईड हिरोने अचानक पुढे यावे, अशा थाटात कॉंग्रेस नेते विलास मुत्तमेवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या सभेत मुंबईबाबत जी भूमिका मांडली त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वेगळ्या विदर्भासंदर्भात मुत्तेमवार आणि कॉंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्याचेही त्यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाल्याचे फडणवीस यांनी या पत्रकात नमूद केले आहे. फडणवीस यांनी पुढे सांगितले आहे की, आपण पंतप्रधान असेपर्यंत मुंबई ही कुठल्याही स्थितीत महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत केले होते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप काही लोक राजकीय स्वार्थापोटी करत होते. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. लहान राज्यांसंदर्भात भाजपाची भूमिका ही सैद्धांतिक आहे. भाजपा हा लहान राज्यांच्या बाजूने आहे. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड या तीन राज्यांची निर्मिती भाजपानेच केली होती. आमचा पक्ष राज्याचे तुकडे करीत नाही तर राज्य निर्माण करतो. पण कॉंग्रेस पक्ष राज्य तोडतो. तेलंगणा हे त्याचे उदाहरण असून जनता हे समजण्याइतपत सुज्ञ असल्याचे देखील फडणवीस यांनी या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
