ऑनड्युटी ३६ तास

election
मुंबई – राज्यात येत्या १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील उच्च माध्यमिक आणि प्राथमिक महाविद्यालयातील १०० टक्के शिक्षकांवर निवडणुकाच्या कामाचा बोझा लादला जाणार आहे. यापूर्वी १८ ते २४ तास काम करणाऱ्या शिक्षकांना आता जवळपास ३६ तासांहून अधिक काळ ऑनड्यूटी रहावे लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १४ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजल्यापासून ते १५ ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत काम करावे लागणार असल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महत्त्वाच म्हणजे ८० टक्के शिक्षकांना १३ ऑक्टोबरलाच निवडणुकाच्या कामाच्या प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आल्याने अनेकांची अधिकच अडचण झाली आहे.

तसेच निवडणुका असल्याने राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेसह अनेक शाळांमधील परीक्षंचे वेळापत्रक बदलण्याची वेळ येऊन ठेपली असल्याने शिक्षकांच्या कामात आणखी भर पडली होती. लोकसभा निवडणुकीचा कटू अनुभव लक्षात घेता यंदाही १४ आणि १५ ऑक्टोबरला निवडणूक ड्युटी जाहीर झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या शिक्षकांना यंदाच्या या निवडणुकीसाठी १४ तारखेपासून ते १५ ऑक्टोबरच्या रात्री उशिरापर्यंत काम करावे लागणार आहे. मुख्य म्हणजे यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने निवडणूक ड्युटीवरील शिक्षकांसाठी तीन वेळा प्रशिक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार १३ तारखेला हे प्रशिक्षण होणार आहे. त्याचा फटका राज्यातील सर्व शाळांना बसणार असून मुलांची परीक्षा घ्यायची तरी कशा असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.याशिवाय निवडणूक ड्युटीसाठीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी १६ ऑक्टोबरला सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यासाठी निवडणूक आयोगासह मुख्य सचिवांना दिलेल्या पत्राची आठवण करून देत अनेक शिक्षकांनी यासंदर्भात लवकरात लवकर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.