
विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला आहेच, परंतु या बालेकिल्ल्यात भाजपा आणि शिवसेनेचे सर्वाधिक वर्चस्व असलेला जिल्हा म्हणून बुलडाण्याचा उल्लेख केला जातो. यावेळी सुद्धा हा प्रभाव कायम आहे आणि मोदी लाट ओसरल्याच्या कितीही चर्चा होत असल्या तरी बुलडाण्यात मोदी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये कितीही रंगी निवडणुका होत असल्या तरी त्या निवडणुका तशा होण्याचे किंवा न होण्याचे जे काही फायदे आहेत ते जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये बुलडाणा, मेहकर, सिंदखेड राजा, चिखली, मलकापूर, जळगाव जामोद आणि खामगाव हे सात मतदारसंघ आहेत.
बुलडाण्यात मोदी लाट कायम
२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना चांगले दिवस नव्हते असे म्हटले जाते आणि गेल्या २५ वर्षात २००९ सालीच या दोन्ही पक्षाचे सर्वात कमी आमदार निवडून आले. पण तरीही त्या प्रतिकूल परिस्थितीत या जिल्ह्यातील सातपैकी चार जागा भाजपा-सेना युतीने मिळवल्या होत्या. त्यातल्या दोन जागा भाजपाला आणि दोन जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. उर्वरित तीन जागांपैकी दोन जागा कॉंग्रेसकडे आणि एक जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होती. आता युती मोडली आहे आणि आघाडीही मोडली आहे. परंतु शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली असल्यामुळे शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ही जागा मिळाली. त्याचा परिणाम अजूनही जाणवत आहे आणि भारतीय जनता पार्टी आपले वर्चस्व सिद्ध करण्यात यशस्वी होणार आहे.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून २००९ साली विजयराज शिंदे हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. आता यावेळीही पुन्हा तेच उभे आहेत, मात्र त्यांच्या विरोधात यावेळी भाजपाचा उमेदवार आहे. भाजपाने योगेंद्र गोडे यांना मैदानात उतरवले आहे. कॉंग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ हेही प्रभावी उमेदवार आहेत. शिवसेनेचे विजयराज शिंदे आणि कॉंग्रेसचे सपकाळ या दोघांतील लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे योगेंद्र गोडे हे बाजी मारतील असा अंदाज आहे. मेहेकर हा सुद्धा एक शिवसेनेचा मतदारसंघ. २००९ च्या निवडणुकीत तिथून शिवसेनेचे डॉ. संजय भास्कर रायमुलकर हे विजयी झाले होते आणि याहीवेळ्ी पुन्हा त्यांनाच मैदानात उतरवलेले आहे. ही जागा राखीव आहे आणि शिवसेनेने या जागेवर डॉक्टर असलेला उमेदवार पुन्हा एकदा दिला आहे. त्याचा परिणाम होऊ शकेल. कॉंग्रेसचे उमेदवार लक्ष्मणराव घुमरे हे फार मोठा प्रभाव पाडणार नाहीत, त्यामुळे डॉ. रायमुलकर यांचे पारडे जड झालेले आहे.
बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यामध्ये भारतीय बहुजन महासंघाचा बराच प्रभाव आहे आणि मेहकर मतदारसंघात या पक्षाचे प्रकाश गवई उभे आहेत. त्यांचा परिणाम लक्ष्मणराव घुमरे यांच्या मतांवर होईल आणि रायमुलकर यांच्या मतांमध्ये भाजपाचे नरहरी गवई हे फूट पाडतील अशी शक्यता दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अश्विनी आखाडे यांना आपला उमेदवार म्हणून आखाड्यात उतरवले आहे त्यामुळे ही लढत पंचरंगी झाली आहे. मात्र सगळ्या समीकरणांचा विचार केला असता शिवसेनेचे संजय रायमुलकर हे हा मतदारसंघ राखतील अशी शक्यता आहे.
या जिल्ह्यातला चिखली हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे. राहुल बोंद्रे यांनी २००९ साली या ठिकाणी विजय मिळवला होता. आता तेच पुन्हा उभे आहेत आणि आघाडी फुटल्यामुळे त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे ध्रुपदराव सावळे हे मैदानात उतरले आहेत. मात्र भाजपा-सेना युती मोडल्यामुळे मुळातच कमी प्रभाव असलेल्या युतीमध्ये दोन भागीदार झाले आहेत. शिवसेनेचे प्रतापसिंग राजपूत आणि भापजाचे सुरेशअप्पा खबुतरे असे दोघे उभे आहेत. पण त्यांचा फार प्रभाव नाही. त्यातच कॉंग्रेसविरोधी मतात फूट पाडण्यासाठी मनसेचे विनोद खरपास उभे आहेत. परिणामी कॉंग्रेसचे राहुल बोंद्रे यांची निवडणूक सोपी झाली आहे.
मलकापूरमध्ये २००९ साली भाजपाचे चैनसुख संचेती हे निवडून आले होते. पुन्हा एकदा तेच उभे आहेत आणि त्यांना कॉंग्रेसच्या अरविंद कोलते यांच्याशी सामना करावा लागत आहे. हे दोन्ही उमेदवार तसे तुल्यबळ असले तरी संचेती कुटुंबाची लोकप्रियता चैनसुख संचेती यांच नैय्या पार पडण्यास उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे वसंतराव भोजने, राष्ट्रवादीचे संतोष रायपुरे आणि भारतीय बहुजन महासंघाचे वसंतराव दांडगे निवडणूक लढवत आहेत. हे तीन उमेदवार फारसा प्रभाव पाडणार नाहीत. संचेती यांची फेरनिवडणूक सोपी आहे.
सिंदखेड राजा हा एक राष्ट्रवादीने जिंकलेला मतदारसंघ आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे हे कॉंग्रेसचे आमदार आहेत. याही निवडणुकीत पुन्हा तेच उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेखाताई खेडेकर या उभ्या आहेत. रेखाताई खेडेकर या पूर्वी भाजपाच्या आमदार होत्या, पण त्या आता राष्ट्रवादीत जाऊन शिंगणे यांना आव्हान देत आहेत. भाजपाला आपला उमेदवार बदलावा लागला आहे आणि आता त्यांचे उमेदवार गणेश मांटे हे आहेत. शिवसेनेतर्फे उभे असलेले शशीकांत खेडेकर हे या भागातील प्रभावी उमेदवार समजले जातात. त्यामुळे शिंगणे यांची सत्ता तसेच शशीकांत आणि रेखाताई खेडेकर यांचा प्रभाव यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
खामगाव हा या जिल्ह्यातला गाजलेला मतदारसंघ होय. कारण या मतदारसंघातून कॉंग्रेसचे दिलीप सानंदा पुन्हा उभे आहेत. शेतकर्यांना कर्ज देऊन लुबाडणारे सावकार म्हणून त्यांची प्रतिमा उभी आहे आणि तिचा फटका त्यांना बसू शकतो. विशेष म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर यांनी सानंदा यांच्या समोर मोठेच आव्हान उभे केलेले आहे. बुलडाणा जिल्ह्यातला खामगाव हा मतदारसंघ कॉंग्रेसकडून हिसकावून घेण्यात यावेळी भाजपाला यश मिळेल अशी अपेक्षा आहे. यामागे मोदी लाट तर कारणीभूत आहेच, परंतु सानंदा यांच्या सावकारीविरुद्ध पांडुरंग फुंडकर यांनी आवाज उठवला होता त्याचाही प्रभाव जाणवले.
जळगाव जामोद या मतदारसंघात भाजपाचे संजय कुटे हे निवडून आले होते, आता पुन्हा तेच उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संतोष घाटोळ यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे तिथले उमेदवार अगदीच निष्प्रभ आहेत आणि भारतीय बहुजन महासंघाचे वसंतराव दांडगे हे तेवढे दांडगे उमेदवार नाहीत. त्यामुळे जळगाव जामोद हा मतदारसंघ भाजपाकडे राहील अशी अपेक्षा आहे. एकंदरीत या निवडणुकीमध्ये भाजपाला चार जागा मिळतील आणि कॉंग्रेस, शिवसेना यांना एकेक जागा मिळेल असे चिन्ह दिसत आहे.
