
नाशिक – नाशिक येथे भाजप नेते एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगत असल्याचे दिसल्यामुळे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले असल्याचा जबरदस्त टोला लगावला असून खडसेंनी राष्ट्रवादी नेत्यांवरही शरसंधान साधले आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत – खडसे
उद्धव ठाकरे आता मागच्या दाराने मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघत असल्याचे सांगून खडसेंनी ठाकरेंची हिच इच्छा युती तटण्याचे प्रमुख कारण असल्याचेही म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची लालसा असल्याचे सांगतानाच एकनाथ खडसेंनी आपली मुख्यमंत्रीपदाची दावेदारीही करून टाकली आहे.
ग्रामपंचायतीपासूनचा कामाचा अनुभव मला आहे. तसेच मला प्रशासकीय कामाचाही दांडगा अनुभव असल्याने मीच भाजपचे सत्ता आल्यावर मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याचेही एकनाथ खडसे म्हणतात. भाजपतील नेत्यांमध्ये निवडणूकीआधीच सीएम पदावरून आता रस्सीखेच सुरू होणार असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे हे फक्त बारामतीचे सुभेदार असल्याचा वार करून खडसेंनी आम्ही सत्तेत येणार, आणि आघाडी सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांना चक्की पिसायला लावणार असा यल्गारही केला आहे.
