बल्लारपूरमध्ये मुनगंटीवार यांना कडवे आव्हान !

sudhir
चंद्रपूर – चंद्रपूर मतदारसंघातून सलग तीन, तर बल्लारपूरमधून एकदा असे चार वेळा विधानसभेवर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार हे निवडून गेले आहेत. मात्र यंदा युती तुटल्यामुळे तसेच स्थानिकांचे कडवे आव्हान असल्याने मुनगंटीवार यांना पाचव्यांदा गड राखणे ही चुरशीची लढाई असल्याचे बोलले जात आहे. कारण यावेळी मुनगंटीवार यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या यादीत घनश्याम मूलचंदानी (काँग्रेस), केशवराव कटरे (शिवसेना), वामनराव झाडे (राष्ट्रवादी), अॅड. हर्षलकुमार चिपळूणकर (मनसे) अशी फौज आहे.

राज्यातील भाजपच्या कार्यकारिणीतील सदस्य असलेल्या मुनगंटीवार यांना बल्लारपूर मतदारसंघात विरोधकांचे भक्कम चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान आहे. मात्र मतदारसंघातील कायम संपर्क ही त्यांची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे.

या मतदारसंघातील अनेक प्रश्न विधानसभेत मांडून मार्गी लावण्यात मुनगंटीवारांना यश आले आहे. मात्र त्यानंतरही विविध उद्योग, कोळसा खाणींमुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्या कायम आहे. देशाच्या चौथ्या क्रमांकावर प्रदूषित जिल्हा म्हणून चंद्रपूरची नवी ओळख होत आहे. त्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. पण नेत्यांनी आश्वासनांच्या पलिकडे काहीही केल्याचे दिसून येत नाही. या निवडणुकीतही सध्या प्रदूषणाचा मुद्दाही गाजत आहे. पोंभुर्ण्यासारख्या मागास क्षेत्राचा विकास, दुर्गम भागांपर्यंत रस्ते पोहोचविणे आणि आदिवासींचा विकास ही आव्हाने कायम आहेत.

Leave a Comment