पुणे जिल्ह्यात लागणार आठ हजार शाईच्या बाटल्या

voting
पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यात आठ हजारांपेक्षा जास्त शाईच्या बाटल्या लागणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली. या अधिकार्‍याने सांगितले की, एक शाईची बाटली ३५० ते ४०० मतदारांना पुरते. मतदानाच्या दिवशी ऐनवेळी कमतरता पडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून काळजी घेतली जात आहे. मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावर मतदान करण्यापूर्वी शाई लावली जाते. ही शाई त्या व्यक्तीने मतदान केल्याची ओळख असते. गडद निळ्या रंगाची ही शाई कर्नाटकातील म्हैसूर येथील म्हैसूर पेंट्स ऍण्ड वॉर्निश लिमिटेड या सरकारी कंपनीद्वारे बनविण्यात येते. सन १९६२ पासून या कंपनीद्वारे उत्पादित केल्या जाणार्‍या शाईचा वापर मतदान केंद्रावर केला जातो. ही शाई निवडणूक विभागाच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटी व नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनआरडीसी) विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली जाते. तसेच या शाईला पाकिस्तान, अफगाणिस्तान, कॅनडा, नेपाळ, कंबोडिया, तुर्की, घाना, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, मलेशिया, मंगोलिया, डेन्मार्क आदी देशांमध्ये देखील मागणी आहे, अशी माहिती देखील यावेळी या अधिकार्‍याने दिली. ते पुढे म्हणाले की, ही शाई बोटावर लावल्यानंतर तीन आठवड्यांपर्यत पुसली जात नाही. या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे ही शाई केमिकलने पुसण्याचा प्रयत्न केल्यास बोटाला इजा पोहोचण्याची शक्यता असते. ही शाई पुसण्यासाठी बाजारात कोणत्याही प्रकारचे केमिकल उपलब्ध नाही, असे देखील ते म्हणाले.