दलित पॅंथरचा पाठिंबा आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला

dalit-panther
पुणे – शिवसेनासोबतच्या युतीतून बाहेर पडलेल्या दलित पॅंथरने विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींना राजकारणातून दूर ठेवण्यासाठी ही भूमिका घेतली असल्याचे दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनावणे यांनी सांगितले. दलित पॅंथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर पॅंथर शिवसेनासोबतच्या युतीतून बाहेर पडली होती.

यावेळी सोनावणे म्हणाले की, जातीयवादी शक्तींना विरोध करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत पॅँथर संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सहकार्य करील. ढसाळ यांना शिवसेनेमुळे अनेक यातना झाल्या. आजारी असताना सेनेने ढसाळ यांना मदत केली नाही. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांनी देखील ढसाळ कुटुंबियांना आर्थिक मदत केली. त्याचवेळी ढसाळ यांनी राष्ट्रवादीबरोबर जाण्याचे सूचित केले होते. त्यांच्या निधनानंतर संघटनेच्या अध्यक्षा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीला पाठिंबा देताना कोणत्याही अटी घातलेल्या नाहीत. अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी पॅंथर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.