पुणे शहरातील जुन्या इमारतींचे सर्वेक्षण सुरु

pune-building
पुणे – पुणे शहरातील ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारती राहण्यासाठी धोकादायक झाल्या आहेत का, याची तपासणी करण्यासाठी या इमारतींचे सर्वेक्षण करण्याची मोहिम महापालिकेतर्फे हाती घेण्यात आली आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार, शहर व परिसरात अशा प्रकारच्या सुमारे ४० हजार जुन्या इमारती असून या इमारतींमध्ये किमान सात लाख नागरिकांचे वास्तव्य आहे.

शहरातील जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने अनेकदा प्रयत्न केले आहे. परंतु, या प्रयत्नांना नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भविष्यात एखादी अनुचित घटना घडू नये, म्हणून महापालिकेनेच आता यासंबंधी पुढाकार घेतला असून बांधकाम विभागाच्या सात विभागांत प्रत्येकी २० लाख रुपयांच्या निविदा मागविल्या होत्या. त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे. सर्वेक्षणाच्यावेळी एखाद्या इमारतीची तातडीने दुरुस्ती होण्याची आवश्यकता असल्याचे आढळून आल्यास त्यामधील रहिवाशांना तत्काळ उपाययोजना करण्यास सांगितले जाणार आहे. तसेच त्या इमारतीच्या ऑडिटचा खर्च संबंधित इमारतीच्या मालमत्ता करात समाविष्ट केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेतील अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

Leave a Comment