
बीजिंग – अमेरिकास्थित वाहन उत्पादक कंपनी जनरल मोटर्स (जीएम) पुढील पाच वर्षांत चीनमध्ये १४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत पाच नवीन प्रकल्प उभारणार आहे. जागतिक स्तरावरील सर्वात मोठी कार बाजारपेठेत असलेल्या चीनमधील विक्री वाढवून ५० लाखांपर्यंत नेण्यासाठी कंपनी चीनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जात आहे. जीएम मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅरी बारा यांनी सांगितले की, चीनमध्ये कंपनी ६० नवीन उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. तसेच लक्झरी वाहन असलेली कॅडिलाकसहित अन्य काही गाड्यांची नवी आवृत्ती बाजारात आणण्याची देखील कंपनीची योजना असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कॅलिफोर्निया येथील जागतिक संशोधन संस्था असलेल्या जेडी पॉवर ऍण्ड असोसिएट्सच्या वाहन उद्योग विभागाचे संचालक टीम दुन यांनी सांगितले की, जीएमला प्रगती करण्यासाठी चीनमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. चीनमध्ये करण्यात येणारी ही मोठ्या स्तरावरील गुंतवणूक आहे. वार्षिक वाहन विक्रीच्या आकडेवारीनुसार, जीएम आत्ताही चीनमधील मुख्य कंपनी आहे, असे देखील त्यांनी सांगितले. जीएमच्या ताज्या आकडेवारीनुसार कंपनीने मागील वर्षी चीनमध्ये विक्रमी ३१ लाख गाड्यांची विक्री केली होती.
