शनिवारी कोल्हापूरात मोदींची जाहीर सभा

narendra-modi
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला राज्यात सुरूवात झाली असून, सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा जाहीर सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रात धडाडणार आहेत. येत्या शनिवारी कोल्हापूरात भाजपा उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याही सभा होणार आहेत.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी येत्या शनिवारी कोल्हापूरातील तपोवन येथे सकाळी दहा वाजता भाजपच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती दिली. त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार पी. एन. पाटील आणि शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराची सुरूवात सोमवारपासून होत आहे. करवीरमधून काँग्रेसचे उमेदवार पी. एन. पाटील यांच्या प्रचाराची सुरूवात हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ९ वाजता कसबा बीड येथून होणार आहे. तर राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराची सुरूवातही कोटीतीर्थ येथील स्वामी समर्थ मंदिरातून सकाळी दहा वाजता होणार आहे. क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रचार सभा होणार आहे.