महात्मा गांधींचे मोदींनी भाषणात घेतले चुकीचे नाव

narendra-modi
न्यूयॉर्क – पाच दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून आज ते वॉशिंग्टनला जाणार आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतील. त्याआधी रविवारी त्यांनी न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध मेडिसन स्क्वेअर गार्डनवर भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित केले. मोदी यांच्या येथील भाषणावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. मोदींनी भाषणात नवीन काहीच सांगितले नाही, जुन्याच गोष्टी पुन्हा एकदा कथन केल्या, त्यातही महात्मा गांधींच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. या कारणांमुळे मोदींच्या भाषणावर टीका होत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुर्ण नावाचा मोहनदास करमचंद गांधी असा उल्लेख करण्याऐवजी मोहन लाल गांधी असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मोदींनी महात्मा गांधीचे नाव चुकविल्याने सोशल मीडियावर युजर्सनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर, मोदींच्या बचावासाठी भाजपच्या एक महिला कार्यकर्त्या पुढे सरसावल्या आणि त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या बचावात लिहिले, महात्मा गांधींच्या काही कागदपत्रांवर त्यांचे नाव मोहनलाल गांधी असे लिहिलेले आहे.