
वॉशिग्टन- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल न्यूयार्कला पोहोचले आणि हॉटेलबाहेर त्यांचे भव्य स्वागत झाल्याच्या बातम्या येत असतानाच अमेरिकेचे प्रशासन निराळ्याच अडचणीत सापडले आहे. मोदी व्हाईट हाऊसला २९ व ३० सप्टेंबरला भेट देणार आहेत. त्यात अध्यक्ष ओबामा यांच्याबरोबर डिनर व उपाध्यक्ष जो बिडेन यांच्याबरोबर लंच असाही कार्यक्रम आहे. मात्र मोदी यावेळी नवरात्राचे उपवास करत असल्याने ते कांहीही खाणार नाहीत. परिणामी त्यांच्यासमोर बसून अध्यक्ष ओबामा आणि उपाध्यक्ष बिडेन कसे खाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोदींचा उपवास- ओबामा पेचात
या अगोदर फर्स्टलेडी मिशेल ओबामा यांनी मोदींची अमेरिका भेट ठरल्याबरोबर त्यांना देण्यात येणारी मेजवानी अगदी शॉर्ट स्वरूपाची ठेवण्याचा आग्रह धरला असल्याच्या बातम्यांनी अनेक मोदी प्रेमी संतप्त झाले होते. मात्र आता मोदी कांहीच खाणार नसल्याने ओबामा कुटुंबियांची चांगलीच पंचाईत झाली आहे. व्हाईट हाऊसचे मुख्य शेफ वॉल्टर शीब यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाईट हाऊसमध्ये मेजवानी साठी येणार्या पाहुण्यांनी कांहीच न खाण्याची ही अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असावी. मोदींचे व्रत असल्याने त्याचा मान ठेवला जाणार पण त्यांच्यासमोर बसून दुसर्यानी जेवणे हे अशोभनीय दिसणार आहे. परिणामी प्रशासनाने या मेजवानीबद्दल कांहीच न बोलण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
