महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाची संधी कोणाला?

cm
मुंबई – महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार प्रत्येक पक्षात अनेकजण असले तरी नक्की कोणाला ही संधी मिळण्याची शक्यता आहे या संबंधीची भाकिते वर्तविली जाऊ लागली असून ज्योतिषांना या काळात चांगलीच मागणी आली आहे. प्रत्येक जण आपापल्या मगदुराप्रमाणे भविष्य वर्तवित आहेत. इंदोरचे ज्योतिषी शर्मा यांनीही त्यासंदर्भात कांही ठोकताळे सांगितले आहेत.

शर्मा यांच्या म्हणण्यानुसार राज्यात युती व आघाडी फुटली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद अकल्पितपणेच मिळाले होते मात्र सध्याचे दिवस त्यांना थोडे अडचणीचे आहेत व त्यामुळे त्यांना पुन्हा हे पद मिळण्याची शक्यता नाही. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित यश मिळणार नाही तसेच त्यांचा फारसा प्रभावही राहणार नाही. त्यामुळे त्यांच्यापासूनही मुख्यमंत्रीपदाची माला दूरच राहील. तुलनेने विधान परिषद विरोधी नेते विनोद तावडे याची ग्रहस्थिती उत्तम आहे. त्यांना मानसन्मानाचे योग आहेत तसेच मोठे पद प्राप्त होण्याची शक्यताही आहे.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक असल्याचे निवेदन जारी केले आहे. त्यांची ताकद वाढणार हे निश्चित आहे आणि त्यांना निवडणुकांत चांगले यश मिळेल. मित्रपक्षांनाही ते यशाची चव चाखवितील. मनसेचे राज ठाकरे यांचे स्वास्थ चांगले राहील आणि सन्मानाचे योगही येतील मात्र ते प्रामुख्याने किंगमेकर म्हणून भूमिका बजावू शकतील. भाजपच्या पंकजा मुंडे यांनाही ग्रहांची चांगली साथ मिळेल. पक्षात मोठे पद मिळेल आणि त्यांची लोकप्रियताही वाढेल असे शर्मा यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळ चांगला आहे. वैयक्तीक यशाच्या सुवार्ता येतील मात्र सत्तासुखापासून त्यांना दूर जावे लागेल तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वबळावर पक्षाला मोठे यश मिळवून देऊ शकणार नाहीत. रिपब्लीकनचे रामदास आठवले यांना मोठे पद मिळण्याची शक्यता धूसर आहे.

Leave a Comment