
नांदेड : खासदार व माजी आदर्श मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण या काँग्रेसच्या नांदेड जिल्हयातील भोकर मतदारसंघातून अधिकृत उमदेवार असणार आहेत. त्यांना पक्षातर्फे ‘एबी’ फॉर्म देण्यात आला आहे. त्यांचे बंधू व भाजपाचे उमदेवार माधव किन्हाळकर यांच्याशी त्यांची थेट लढत असणार आहे.
अमिता चव्हाण काँग्रेसच्या भोकरमधून अधिकृत उमेदवार
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस हायकमांडने उमदेवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अशोक चव्हाण यांनी भोकरमधून उमदेवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासह काँग्रेसचे बी. आर. पाटील यांनीसुध्दा उमदेवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे काँग्रेसतर्फे कोणाला ‘एबी’ फार्म मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऐनवेळी पक्षातर्फे अमिता चव्हाण यांनी ‘एबी’ फॉर्म देण्यात आला. त्यामुळे त्या काँग्रेसच्या अधिकृत उमदेवार म्हणून निवडणुक रिंगणात असणार आहेत. या मतदारसंघातील मुख्य लढत ही भाऊ-बहिणीमध्ये होणार असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
