
मुंबई : इंग्लंड दौऱ्यात चमदार कामगिरी करणारा भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे राधिकासोबत पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध झाला. मराठमोळे अजिंक्य आणि राधिकाचे हे अरेंज मॅरेज आहे. यापूर्वी अनेक क्रिकेटपटूंनी प्रेमविवाह केल्याचे आपण ऐकले आहे. मात्र त्याला आता रहाणे अपवाद ठरला आहे. आज दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली. अजिंक्य आणि राधिका दोघेही मुंबईतील मुलुंड भागात राहतात.
विवाहबंधनात अडकला अजिंक्य रहाणे
रहाणे चांगला क्रिकेटपटू आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. पण तो कराटे चॅम्पियन असल्याची कल्पना फार कमी जणांना आहे. कराटेमध्ये त्याने ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. लाजाळू असल्यामुळे, अजिंक्यला त्याच्या वडिलांनी कराटे क्लासला घातले होते. याशिवाय त्याला गाणी ऐकण्याचाही छंद आहे.
रहाणेने भारतासाठी आतापर्यंत १० कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंडदौऱयात विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय इंग्लंड गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करत होते तेव्हा रहाणेने भारताची बाजू सांभाळत दमदार कामगिरी करत इंग्लंडची गोलंदाजी भेदून काढली होती. लॉर्डवरील ऐतिहासिक वारसा असलेल्या खेळपट्टीवर रहाणेने शानदार शतक ठोकून भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
