
मुंबई : सोशल मीडियाद्वारे आयफोन ६ प्लसमध्ये त्रुटी असल्याचे समोर आल्यानंतर, आता यावर अॅपल कंपनीनेही ठोस पावले उचलली असून त्रुटी असेलेले फोन युझर्सना रिप्लेस करुन मिळतील, असे आश्वासन कंपनीने दिले आहे.
अॅपल परत देणार वाकलेले ‘आयफोन ६ प्लस’ !
सोशल मीडियावर आयफोन ६ प्लस प्रेशरमुळे वाकतो, अशा बातम्या पसरल्या होत्या. एका युझरने यु ट्यूबवर यासंबंधित व्हिडीओ अपलोड केला तर काहींनी वाकणाऱ्या आयफोन ६ प्लसचे फोटोही शेअर केले.
पॅण्टच्या खिशात आयफोन ६ प्लस ठेवून बसल्यावर किंवा प्रेशरमुळे तो वाकतो. तसेच हा फोन ३º डिग्री पर्यंत वाकतो, अशी तक्रारही युझर्सनी केली होती. मात्र आयफोन ६ मध्ये अशाप्रकारची कोणतीही तक्रार आलेली नाही.
हे फोन वाकण्याचे मुख्य कारण आयफोन ६ प्लसची मोठी स्क्रीन(५.५ इंच) आणि अॅल्युमिनिअम फ्रेम असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे अनेक तक्रारी आल्यानंतर वाकलेले आयफोन ६ प्लस रिप्लेस करण्यात येतील, असे अॅपलतर्फे सांगण्यात आले. हे हॅण्डसेट व्हिज्युअल इन्स्पेक्शनच्या आधारावरही बदलण्यात येतील. इतकेच नाही तर जर आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस यांच्याबाबत नेहमीच्या वापरादरम्यानही काही तक्रार असेल तर वॉरंटी सर्व्हिस अंतर्गत हा फोन रिप्लेस करता येईल, असेही कंपनीने म्हटले आहे.
