अस्सल आणि नक्कल

narendra-modi
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेचा प्रारंभ करताच उद्योग विश्‍वामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, पण कॉंग्रेसमध्ये मात्र आदळआपट सुरू झाली. आज काल नरेंद्र मोदी यांनी कोणतीही नवी योजना सुरू केली की, कॉंग्रेसवाल्यांचे असेच व्हायला लागले आहे. त्यांनी नवी कल्पना मांडली की, कॉंग्रेसवाले ही तर आमचीच नक्कल आहे असा आरडाओरडा करायला लागले आहेत. खरे म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था राबवायची म्हटल्यानंतर थोड्याबहुत फरकाने तेच तेच कार्यक्रम पुढे करावे लागणार आहेत. मुक्त अर्थव्यवस्था राबवायला सुरुवात केल्यापासून कॉंग्रेस पक्षाने परदेशी भांडवलाला प्रोत्साहन दिले. खरी गरज त्याचीच होती. मग मूळ मुद्दा तोच असेल तर कोणीही त्या दिशेने सुरू केलेल्या प्रयत्नांना कॉंग्रेसचीच कॉपी म्हणावी लागेल. तसा विचार केला तर कॉंग्रेसच्या कित्येक योजनांच्या आधी नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात ही कल्पना राबवली होती, मात्र कॉंग्रेसने त्याची कॉपी केली. नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसचीच कॉपी केली आहे असे वादासाठी गृहित धरले तरी चांगल्या कल्पनेची कॉपी करण्यात चूक काय, असाही प्रश्‍न विचारता येतो. कॉंग्रेसची कल्पना चांगली होती, पण कॉंग्रेसचे नेते भ्रष्टाचारात एवढे मग्न झाले होते की, त्यांना कोणतीही नवी कल्पना जीव तोडून राबवता येत नव्हती. त्यांचीच ती कल्पना नरेंद्र मोदी यांनी मात्र छान राबवली आहे. कोणतीही योजना कागदावर कशी आहे यापेक्षा प्रत्यक्षात कशी राबवली जाते याला महत्व असते आणि मोदी ती अंमलबजावणी अतीशय सक्रियपणे, मन:पूर्वक करत आहेत.

त्यांनी मेक इन इंडिया चा उद्घाटन समारंभ अमेरिकेला जाण्यापूर्वीच केला आणि त्यातून अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांना सकारात्मक संदेश दिला. मेक इन इंडिया हा भारताचे ब्रॅँडिंग करण्याचाच प्रकार आहे. कारण भारताचे असे ब्रँडिंग केल्याशिवाय भारतात परदेशी गुंतवणूक येणार नाही. ज्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचा व्हिजन २०२० हा ग्रंथ वाचलाय त्यांना हे ब्रँडिंग का करावे हे कळेल. भारत हा देश महाशक्ती होईल पण तो लष्करी महाशक्ती होणार नाही हे कलाम यांनी आपल्या ग्रंथात म्हटले आहे. भारताकडे स्वत:चे रक्षण करण्याची फार सक्षम यंत्रणा असेल पण तो आक्रमक नसेल. भारत महाशक्ती होईल तो माहिती तंत्रज्ञानात आणि औद्योगीकरणात. देशाची सारी क्षमता उपयोगात आणली तर भारत २०२० साली इंडस्ट्रीयल हब होईल. भारताविषयीच्या भाकिताचा नेमका अर्थ इंडस्ट्रीयल हब या शब्दात सामावलेला आहेे. जगात ज्याला कोणाला नवा कारखाना काढायचा असेल त्याने भारतात यावे आणि येथे आपल्याला हवा असणारा कारखाना काढावा. त्याला पाणी, जमीन, वीज अशा सोयी मिळतील आणि आवश्यक तेवढे कामगार, कर्मचारी. तंत्रज्ञ असे कुशल मनुष्यबळ मिळेल. त्यांनी या देशात येऊन या देशाला लागेल ते आणि लागेल तेवढे निर्माण करावे आणि जादा निर्माण होईल ते अन्य देशांना निर्यात करावे. कारण हा सारा आटापिटा करण्यास आवश्यक असलेल्या सार्‍या गोष्टी भारतात उपलब्ध आहेत.

याबाबत निसर्गाने भारताला भरभरून दिले आहे. खरे तर या नैसर्गिक देणगीचा वापर भारताने स्वत:च करायला हवा. आपल्याच देशातल्या भांडवलदारांचे भांडवल वापरायला हवे आणि स्वत:च्याच ताकदीवर काय व्हायचे ते व्हावे असे अनेकांचे मत आहे. तेही बरोबरच आहे. पण अशी मोठी गुंतवणूक करून तयार होणारा माल जागतिक बाजारात स्वस्तात विकावा लागतो. तसा तो विकायचा असेल तर भारतात होणार्‍या गुंतवणुकीतून तयार होणारा माल स्वस्त असला पाहिजे. असा स्वस्त माल तयार करण्यासाठी स्वयंंचलित यंत्रे बसली पाहिजेत. त्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक करण्याएवढे भांडवल आपल्या देशात नाही. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आपल्याकडे नाही. या दोन अडचणीवर मात करून उद्योग वाढवायचा असेल तर परदेशी गुंतवणूक आयात करण्याला काही पर्याय नाही.

त्यासाठी कुशल पण स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे लागते. तयार होणार्‍या मालाची निर्यात करायची तर गरज असतेच पण, तयार होणार्‍या मालातला बराचसा माल स्थानिक बाजारातच खपावा एवढी स्थानिक बाजारपेठही संपन्न असायला हवी. जगात परदेशी गुंतवणूक करण्यास पात्र असे अनेक देश आहेत पण तो देश हीच एक मोठी बाजारपेठ आहे असे अन्य कोणत्याही देशाच्या बाबतीत दिसून आलेले नाही. भारत हाच एक असा देश आहे की जो बाजारपेठ आणि गुंतवणूक क्षेत्र अशा दोन्ही बाबतीत चांगला आहे. कारण भारताची लोकसंख्या मोठी आहे आणि या देशातला ३० टक्के समाज हा चांगली क्रयशक्ती असणारा आहे. म्हणजे भारतात एखाद्या देशाने गुंतवणूक करून काही तयार केले तर त्या तयार मालाचा मोठा हिस्सा भारतातच विकला जाईल. गुंतवणूक करणारांना असाच देश हवा असतो. भारतातल्या अनेक बाबी गुंतवणुकीला अनुकूल आहेत. म्हणून भारत हा इंडस्ट्रीयल हब होऊ शकतो.

भारताला संपन्न व्हायचे असेल तर अशा परदेशी गुंतवणुकीला चालना दिली पाहिजे. याच हेतूने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मेक इन इंडिया असा नवा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यात अनेक परदेशी गुंतवणूकदारांना आवाहन केले आहे. भारतातले वातावरण परदेशी गुंतवणुकीला अनुकूल असल्याची खात्री दिल्याशिवाय भारतात गुंतवणूक होणार नाही ही गोष्ट मोदी यांना चांगली माहीत आहे. म्हणूनच त्यांनी या कार्यक्रमातून तशी ग्वाही दिली आहे. गुंतवणूक दारांनी आपला पैसा भारतात गुंतवावा तो वाया जाणार नाही असेही मोदींनी म्हटले आहे. शेवटी कोणताही व्यापारी नफा व्हावा यासाठीच गुंतवणूक करीत असतो. एकदा भारतात परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली की, लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांची क्रयशक्ती वाढेल. तो उद्योगात तयार होणार्‍या वस्तू खरेदी करायला लागेल. त्यातून उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची गुंतवणूक वाढेल. असे हे क्रयशक्ती आणि गुंतवणूक यांचे सकारात्मक वर्तुळ आहे. त्याला पंतप्रधानांनी चांगली चालना दिली आहे. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात अनेक बडे उद्योगपती उपस्थित होते. त्यांच्यात चांगला उत्साहही होता. एकंदरीत भारतात परदेशी गुंतवणुकीला चालना मिळण्यासाठीचे अच्छे दिन यायला लागले आहेत. त्या दिशेने आपल्या नोकरशाहीनेही आपल्यात काही बदल घडवण्याचे ठरवले आहे. हीही बाब त्या दृष्टीने अधिक उत्साहाची आहेे.

Leave a Comment