का सोडतात लोक घरे ?

police
आपल्या देशातले सगळेच पोलीस काही प्रामाणिक नसतात. त्यातले फार कमी पोलीस अधिकारी आपल्या हातात असलेल्या अधिकारांचा वापर करून समाजात चांगले वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत असतात. बाकी सारे अधिकारी आलेला दिवस पुढे ढकलत काम करीत असतात. त्यांच्या हातून समाजाचे प्रश्‍न कधीच सुटत नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोलिसांनी मात्र काही तरी करण्याचा निश्‍चयच केला. त्यांच्याकडे बेपत्ता लोकांविषयीच्या अनेक तक्रारी होत्या. त्यांचा तपास केला नाही आणि ते सापडत नाहीत असा अहवाल वर पाठवून देऊन फाईल बंद केली असती तर त्यांना काही शिक्षा होणार नव्हती. पण त्यांनी आपल्याकडे दाखल झालेल्या हरविलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीचा छडा लावायचाच असा निर्धार केला. ही बातमी आहे कारण पोलीस असा शोध घेत नाहीत. त्यामुळे देशात लक्षावधी मुले हरवतात आणि त्यांचा नंतर पत्ताच लागत नाही. त्यांचे पुढे काय होते हेही कळत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोलिसांनी निर्धार करताच हरविलेल्या अनेक लोकांतल्या बहुतेकांचा शोध लागला.

या लोकांचा शोध लागला पण त्यांच्या घरातून निघून जाण्याच्या कारणांचा शोध घ्यायला सुरूवात केली तेव्हा त्या कारणांचा तर शोध लागलाच पण त्यातून आपल्या बिघडत चाललेल्या कुटुंब व्यवस्थेचाही शोध लागला. हा आपल्या समाजाचा शोध फार चिंता करायला लावणारा आहे कारण पळून जाणार्‍या लोकांना आपले घर नकोसे झाले होते. त्यांना त्यांच्या कुटुंबात संरक्षण मिळाले नव्हते. समाजाच्या अवनतीवर प्रकाश टाकणारी ही माहिती पोलीस शक्यतो कोणाला सांगत नाहीत आणि सांगितली तरी तिचे गांभीर्य ऐकणार्‍यांच्या लक्षात येतेच असेही नाही. कारण आपण सगळेच लोक समाज स्थितीविषयी फार बोथट झालो आहोत. समाजाला भेडसावणारी एखादी समस्या जोपर्यंत आपल्या दाराशी येत नाही किंवा आपल्या घरातला एखादा सदस्य जोपर्यंत त्या समस्येत होरपळून निघत नाही तोपर्यंत आपण त्या समस्येकडे ढुंकूनसुद्धा पहात नाही आणि पाहिले तरी त्या समस्येवर काय इलाज करता येईल यावर विचार करत नाही. असे सारेच गप्प असल्यामुळे समाजात आज विविध प्रश्‍न भयावह या प्रमाणात समोर येत आहेत. काही वेळा काही पोलीस अधिकारी सूचक पद्धतीने पत्रकारांना काही तरी माहिती देतात. महाराष्ट्रातल्या एका वेगाने वाढत चाललेल्या परंतु अठरापगड वस्ती असलेल्या एका शहरात दररोज सरासरी चार मुली घरातून नाहीशा होतात, अशी माहिती तिथल्या पोलीस आयुक्तांनीच एका स्वयंसेवी संघटनेला दिली.

या गायब होणार्‍या मुली म्हणजे लव्ह जिहादचाच प्रकार आहे असे नाही. तो फसलेल्या प्रेमाचा म्हणजे प्रेमभंगाचा प्रकार असतो. खरे तर लव्ह जिहाद म्हणजे हिंदू-मुस्लिम मुला-मुलींचे विवाह नव्हेत. मुलगा किंवा मुलगी दोन भिन्न धर्माचे असूनही लग्न करतात म्हणून त्याला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात मुस्लीम असताना हिंदू असल्याचे भासवून मुलींना फशी पाडणे आणि अशा संबंधातून झालेल्या विवाहानंतर मुलगी नेमकी कोठे गेली याचा अजिबात पत्ताच न लागणे याला मात्र लव्ह जिहाद म्हटले जाते. अशी प्रत्यक्षात घडलेली दोन-तीन प्रकरणे ठेवूनच अशा घटनांबाबत काही निष्कर्ष काढता येतील. पण आजचा आपला विषय एकुणात घरातून गायब होणार्‍या लोकांविषयी आहे. घरातून एखादा लहान मुलगा, मुलगी किंवा विवाहित स्त्री सुद्धा एकदम बेपत्ता होते. घरचे लोक पोलिसांत तक्रार दाखल करतात आणि थोडा जुजबी शोध घेऊन काही दिवसांनी फाईल बंद करून टाकतात. ती गायब झालेली व्यक्ती पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे सापडलेली नसते. ती व्यक्ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तिची फाईल बंद करायचीच नाही असा निर्णय घेऊन पोलीस कामाला लागतील तेव्हा अशा व्यक्तींचा तलाश लागण्याची थोडी शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मात्र बेपत्ता लोकांचा शोध लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचा निर्धारच केला.

या जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये ९ महिन्यांत ७७३ जणांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारी नोंदलेल्या होत्या. चंद्रपूरच्या या बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा निर्धार केला. पोलिसांनी मनावर घेतल्यास काय होते याचे हे उदाहरण. ७७३ पैकी ५०४ लोक सापडले हे विशेष होय. नेहमीच्या प्रकारात एवढे काय पण बोटावर मोजता येतील एवढेही लोक सापडत नाहीत. गायब झालेल्या लोकांमध्ये २८५ पुरुष आणि ४८८ महिला आणि तरुणी होत्या. त्यातील १६२ पुरुष आणि ३४२ महिला सापडल्या आहेत. बेपत्ता लोकांत पुरुष कमी, तरुण मुले काही प्रमाणात, तरुणी बर्‍यापैकी प्रमाणात आणि विवाहित महिला मोठ्या प्रमाणात आहेत. पळून जाणार्‍या तरुणांमध्ये रोजगारासाठी घरातून पळणार्‍यांची संख्या मोठी आहे. आपण घरावर भार झालो आहोत, तेव्हा कोठे तरी जाऊन पैसा कमवला पाहिजे असा निर्धार करून ही मुले पळतात. मुलींमध्ये मात्र प्रेमप्रकरणात अडकून पळणार्‍या मुली मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्यातही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यातल्या बर्‍याच मुलींना काही दिवसांत फसवणूक झाल्याचे लक्षात येते. केवळ शारीरिक आकर्षणाने मुलीला पळवलेले असते, पण त्यासाठी लग्नाचे आमीष दाखवलेले असते आणि फसल्याचे लक्षात आल्यावर मुलींना घरी यावेसे वाटते. पळालेल्या महिलांमध्ये घरातल्या जाचाला कंटाळून पळणार्‍या महिला असतात. त्या घराच्या बाहेर पडतात तेव्हा आपण बाहेरच्या जगापेक्षा घरात जाचात का होईना पण अधिक सुरक्षित होतो हे त्यांच्या लक्षात येते.

Leave a Comment