म्हाडाच्या गृहप्रकल्पांतर्गत पालिका कर्मचाऱयांना मिळणार राखीव कोटा

mhada
मुंबई – मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे मुंबई महापालिकेच्या सर्व विभागातील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाकरीता म्हाडाच्या गृह प्रकल्पांमध्ये राखीव कोटा देण्याची मागणी डिसेंबर महिन्यात केली होती. यावर गृहनिर्माण मंत्री सचिन अहिर यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून याबाबत म्हाडाला आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे सुनील प्रभू यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

म्हाडाच्या गृह प्रकल्पांतर्गत या योजनेचा फायदा पालिकेच्या सर्व विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱयांना होऊ शकतो, असे ते यावेळी म्हणाले. पालिकेच्या मुख्यालयात आणि विविध विभागातील कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत एकूण सव्वा लाख कर्मचारी कामकाज करतात. त्यामुळे याचा फायदा त्यांना नक्की होईल, असेही ते यावेळी म्हणाले. अजून किती टक्के कोटा त्यांच्यासाठी राखीव ठेवावा यावर अद्याप निर्णय झालेला नसून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असेही प्रभू यावेळी म्हणाले.

Leave a Comment