इसिसला नेस्तनाबूत करणार – ओबामा

obama
वॉशिंग्टन – इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅड सिरीया (इसिस) या दहशतवादी संघटनेविरोधातील लढाई अधिक व्यापक करण्याचा अमेरिकेने निर्णय घेतला असून आता इराक बरोबरच सिरियामधील इसिसच्या ताब्यात असलेल्या भूप्रदेशावर अमेरिका हवाई हल्ले करणार आहे.

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अलकायदाने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला तेरावर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, इसिस ना इस्लामिक संघटना आहे, ना त्यांना कुठला धर्म आहे. इसिस मुस्लिमांच्या हिताचा दावा करते मात्र सर्वाधिक मुस्लिमच या संघटनेच्या हिंसाचाराचे बळी ठरले आहेत.

इसिसला ना कुठल्या देशाची मान्यता आहे. ना जनादेश आहे. ही फक्त एक दहशतवादी संघटना आहे. कुठलेही चांगले उद्दिष्ट नसलेली ही संघटना फक्त त्यांच्या मार्गात येणा-या प्रत्येकाला संपवण्याचे काम करते. जर तुम्ही अमेरिकेला धमकावले तर तुम्हाला लपायला जगात कुठेही सुरक्षित जागा मिळणार नाही असा ओबामांनी इसिसला इशारा दिला.

अमेरिका हवाई हल्ले अधिक तीव्र करणार असली तरी, इराक युध्दात उतरणार नसल्याचे ओबामांनी यावेळी स्पष्ट केले. इराकी लष्कराला मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिकेचे आणखी ४७५ अधिकारी इराकला जाणार असल्याचे ओबामांनी यावेळी जाहीर केले.