अपक्षांना पक्षप्रवेश करताच काँग्रेसची उमेदवारी

congress
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीची दावेदारी असलेल्या तीन जागांवर बंडखोरी करून निवडून आलेल्या तिघांसह चार अपक्ष आमदारांना प्रवेश देऊन काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाच; शिवाय या चारही जागांवरील राष्ट्रवादीच्या दावेदारीला आव्हानही दिले आहे.

मराठवाड्यातील नायगावचे अपक्ष आमदार वसंत चव्हाण आणि परतूरचे सुरेश जेथलिया, सातारा जिल्ह्यातील अपक्ष आमदार जयकुमार गोरे, जळगाव जिल्ह्यातील शिरीष चौधरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या चारही जणांना उमेदवारी देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली.

अद्याप जागावाटपाचा निर्णय झाला नाही किंवा कोणत्याच उमेदवारांची घोषणा नसताना ‘बाहेरून’ आलेल्या चौघा अपक्षांना परस्पर उमेदवारी देऊन काँग्रेसने राष्ट्रवादीवर कुरघोडी केली.

नांदेड जिल्ह्यातील नायगावमधून वसंत चव्हाण यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकरांचा पराभव केला होता. गोरठेकर यांनी पु्न्हा तिकीट मागितल्याने आणि २००९ च्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी भरपूर मदत केल्याने त्यांना काँग्रेसिशवाय पर्याय नव्हता.

सातारा जिल्ह्यातील माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली होती. तेही मूळ काँग्रेसचेच आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी त्यांनी आपला मतदारसंघ सोडण्याचीही तयारी दाखवली होती.

परतूरचे अपक्ष आमदार सुरेश जेथलिया हे २००९ मध्ये शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करून निवडून आले. त्यांनी शिवसेनेत परत जाण्याची तयारीही केली होती. मात्र औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांची डाळ शिजू दिली नसल्यामुळे अखेर त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडला.

जळगाव जिल्ह्यातील रावेरमधून तिकीट नाकारल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून शिरीष चौधरी निवडून आले होते. शिरीष चौधरी हे मूळ काँग्रेसमधील नेते म्हणून ओळखले जातात. ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य होते.

Leave a Comment