भारतीय पोस्टाची स्टॅम्प विक्रीसाठी स्नॅपडीलशी भागीदारी

post
दिल्ली- जगातील सर्वात मोठी पोस्टल सेवा म्हणून नावाजलेल्या भारतीय पोस्टाने त्यांच्याकडील दुर्मिळ तिकीटे तिकीट संग्राहकांना उपलब्ध व्हावीत या उद्देशाने ऑनलाईन मार्केटप्लेस स्नॅपडीलशी भागीदारीचा करार केला असल्याचे वृत्त आहे. यामुळे भारतीय पोस्ट विभाग दूरदूरपर्यंत पसरलेल्या ग्राहकवर्गापर्यंत सहजी पोहोचू शकणार आहे. स्नॅनडीलवर भारतीय पोस्टाची दुर्मिळ अशी ३०० रूपयांपासून ५५०० रूपयांपर्यंतची तिकीटे ग्राहक मिळवू शकणार आहेत.

तिकीट संग्रह किवा स्टँप कलेक्शन हा लोकप्रिय छंद म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय पोस्टाकडे असा प्रचंड मोठा संग्रह आहे. स्नॅपडीलचे भारतभर जाळे आहे त्यामुळे तिकीट संग्राहकांना या कराराचा मोठा फायदा तिकीट खरेदीसाठी होऊ शकेल असे स्नॅनडीलचे सहसंस्थापक रोहित बन्सल यांनी सांगितले. ते म्हणाले की पोस्टेज स्टॅम्प म्हणजे मानवी इतिहास, आर्ट, पेंटिग्ज, संस्कृती, परंपरा, राष्ट्रीय वारसा यांची ओळख करून देणारी जगाची खिडकीच असतात.

भारतीय पोस्ट सचिव कावेरी बॅनर्जी म्हणाल्या की आमच्याकडे दुर्मिळ तिकीटांचा प्रचंड मोठा संग्रह आहे.भारतीय पोस्टाचे पहिले तिकीट १८५४ साली प्रसिद्ध झाले. त्यानंतर पहिला स्वातंत्र्यदिन म्हणून १९४७ साली अशोक स्तंभ, राष्ट्रीय ध्वज आणि विमानाचे चित्र असलेली तीन तिकीटे प्रसिद्ध करण्यात आली होती. भारतीय पोस्टाने ३००० हून अधिक तिकीटे प्रोड्यूस केली आहेत. त्यातील अनेक तिकीटे आज दुर्मिळ म्हणून ओळखली जातात. जगात भारतीय पोस्टसेवा ही सर्वाधिक मोठे जाळे असलेली सेवा असून त्यात १.५५ लाख पोस्ट ऑफिसे आहेत. त्यातील १.३९ लाख कार्यालये ग्रामीण भागात आहेत.