
मुंबई – विविध सरकारी कार्यालयांमध्ये फ्लॅट किंवा घर विकत घेतल्यानंतर त्याच्या नोंदणीसाठी हेलपाटे घालण्यात बरेच दिवस निघून जात असल्यामुळे मुद्रांक व नोंदणी विभागाने ई-रजिस्ट्रेशनची सुविधा पुणे आणि मुंबईपाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही सुरू केली असल्यामुळे बिल्डर आणि ग्राहकांची मोठीच सोय होणार आहे.
आता बिल्डरच्या कार्यालयातच होणार ई-रजिस्ट्रेशन
ग्राहकांना आता आपल्या फ्लॅट किंवा घराच्या व्यवहाराची नोंदणी या सुविधेमुळे संबंधित बिल्डरच्या कार्यालयात बसूनच करता येणार असल्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडूनही ई-रजिस्ट्रेशनच्या सुविधेचे स्वागत केले जात असून टप्प्याटप्प्याने ही योजना राज्यभरात लागू केली जाणार आहे. वीसपेक्षा जास्त फ्लॅट्सच्या योजनांसाठी ही सुविधा उपलब्ध असून संबंधित स्कीमसाठी आवश्यक परवानगी घेतल्यानंतर आणि जागेसंदर्भातील कागदपत्रे नोंदणी विभागाकडे सादर झाल्यानंतर त्याची छाननी केली जाईल.
कशी होईल नोंदणी
१. बिल्डरच्या कार्यालयात इंटरनेट, वेबकॅम, बायोमेट्रिक नोंदणीची सुविधा असलेला कॉम्प्युटर आणि एमपीएलएस व्हीपीएनचे कनेक्शन आवश्यक असणार आहे.
२. बिल्डरचे पॅनकार्ड, आधारकार्ड आणि डिजिटल स्वाक्षरीही गरजेची असेल.
३. ग्राहकांकडे पॅनकार्ड, आधारकार्ड आणि अन्य वैयक्तिक कागदपत्रे आवश्यक असून या सुविधेअंतर्गत नोंदणी झालेल्या बिल्डर्सना नोंदणी विभागाच्या यंत्रणेत लॉग-इन आयडी आणि पासवर्डच्या आधारे प्रवेश देण्यात येईल. त्यावर आधीच उपलब्ध केलेल्या मसुद्यातील रिकाम्या जागांमध्ये ग्राहकांचा तपशील भरून वेबकॅमच्या आधारे फोटो घेण्यात येईल.
४. ही सर्व माहिती अपलोड झाल्यानंतर नोंदणी विभागाकडून ई-सबरजिस्ट्रार तपशीलाची छाननी करतील. नंतर ऑनलाईन स्टॅम्पड्युटी भरून घेण्यात येईल. त्यासाठी स्टॅम्पड्युटी, नोंदणी शुल्क आणि अन्य शुल्कांचा हिशोब पोर्टलमध्ये आपोआप होईल.
५. तपासणीत सर्व कागदपत्रे वैध ठरल्यास ‘ई-रजिस्ट्रार’ त्यांची इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी वापरून दस्तावेज तयार करेल आणि त्यानंतर काही दिवसांतच संबंधित दस्तावेज ऑनलाईन उपलब्ध करण्यात येतील.
