संशोधकांना सापडली संजीवनी वनस्पती?

solo
लेह- लडाखच्या अतिउंच हिमालय शिखरांवर भारतीय संशोधकांना वंडर हर्ब म्हणता येईल अशी वनस्पती सापडली असून रामायणात लक्ष्मणाला जीवनदान देणारी संजीवनी वनस्पती हीच असावी असा तर्कही व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक भाषेत या वनस्पतीचे नांव सोलो असे असून शास्त्रीय नांव व्हिडीओला असे आहे. या वनस्पतीवर गेली दहा वर्षे डिफेन्स इन्स्टिीट्यूट हाय अल्टीट्यूड रिसर्च सेंटरमध्ये संशोधन केले जात आहे. ही वनस्पती प्रतिकार शक्ती वाढविणारी, पर्वतीय उंचावरील हवामान सहन करण्याची शकती देणारी आणि रेडिओ अॅक्टीव्हीटीपासून संरक्षण करणारी आहे. तिचे आणखी बरेच गुणधर्म असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लडाख भागात या वनस्पतीच्या पानांचा वापर भाजी म्हणून केला जातो. संशोधनात भूक वाढविणारी, अँटी डिप्रेसंट तसेच जैवरासायनिक बॉम्बमधून बाहेर पडणार्‍या गॅमा किरणांच्या रेडिएशनपासून संरक्षण करणारी असेही तिचे कांही गुणधर्म सापडले आहेत. ही वनस्पती सियाचीनसारख्या अति दुर्गम भागात काम करणार्‍या सैनिकांसाठी संजीवनी ठरू शकेल असा संशोधकांना विश्वास आहे. ही वनस्पती चीन आणि यूएस मध्येही आढळते. चिनी पारंपारिक औषधात ती दीर्घकाळ वापरली जात आहे. मंगोलियात तिचा वापर कॅन्सर आणि क्षय रोगावर केला जातो. रशियात अंतराळवीरांसाठी तिचा वापर केला गेला आहे. वृद्धत्व दूर ठेवण्यासाठीही ती उपयुक्त आहे.

लडाखमधील संरक्षण प्रयोगशाळेत दोन एकरांवर तिची लागवड करण्यात आली असून ही लागवड अन्य ठिकाणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत असे समजते.

Leave a Comment