महाराष्ट्राचे राज्यपाल शंकरनारायणन यांचा राजीनामा

rajyapal
मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल शंकर नारायणन यांनी त्यांच्या राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सादर केला आहे. शंकर नारायणन यांची मिझोराम येथे बदली करण्यात आली होती मात्र मिझोरामला जाणे शक्य नसल्याचे सांगून त्यांनी पदाचा राजीनामा दिला. ८२ वर्षीय शंकरनारायण केरळ राज्यातील काँग्रेसचे वरीष्ठ नेते आहेत. यापुढे राजकारणात सक्रीय होणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

केंद्रात भाजप प्रणीत सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या राज्यपालांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले होते त्यात शंकरनारायणन यांचा समावेश होता. मात्र तेव्हा त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांची बदली मिझोरामला करण्यात आल्यावर त्यांनी राजीनामा दिला आहे.

ते म्हणाले की अनेक राज्यात राज्यपालपदावर काम करताना त्यांनी कधीही राजकारण केलेले नाही. सर्व पक्षांशी मित्रत्वाचे संबंध ठेवले. लोकशाहीत कोणतेच सरकार कायम नसते तसेच कोणतेच पदही कायम नसते. माझी बदली केली हेही कायदेशीर आहे. त्यामुळे माझी कोणाविषयीच कांही तक्रार नाही. शंकरनारायणन यांची मुदत २०१७ साली संपणार होती.२०१२ नंतर त्यांना दुसर्‍यांदा राज्यपाल पद दिले गेले होते.

शंकर नारायणन यांच्या जागी गुजराथचे राज्यपाल ओ.पी कोहली यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी म्हणून हे पद सोपविले गेले आहे.

Leave a Comment