राष्ट्रवादी कॉंग्रेसचे औचित्य

ncp
श्री. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करून, कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष स्थापन केला आणि सोनिया गांधी यांच्याशी संघर्ष करण्याची भूमिका जाहीर केली. परंतु एकच वर्षात त्यांचे हे अवसान गळून पडले आणि त्यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेसशी हातमिळवणी करून सत्तेत वाटा मिळवला. तेव्हापासून अनेकांनी शेवटी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे औचित्य काय हा प्रश्‍न सातत्याने विचारलेला आहे. आता मुळात कॉंग्रेसलाच सत्तेपासून दूर व्हावे लागले आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसही विकलांग झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी शरद पवार यांना कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी एकदा आपला समाजवादी कॉंग्रेस हा पक्ष स्थापन करून, ७ वर्षे चालवून कॉंग्रेसमध्ये विलीन केलेला होता. त्यानंतर १९९९ ला बाहेर पडून त्यांनी हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन केला आहे. पण बरीच वर्षे झाली हा पक्ष टिकला आहे. त्यांचा हा एक पक्ष आणि ममता बॅनर्जींचा तृणमूल कॉंग्रेस हे दोन पक्ष आता टिकले आहेत.

शरद पवारांच्या डोक्यात हाही पक्ष विलीन करण्याची कल्पना कधी आली नसेल असे सांगता येत नाही. मध्यंतरी तशी शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांचे एकत्रिकरण करावे आणि ते करताना आपल्या कन्येला मुख्यमंत्री करण्याची अट घालावी असा शरद पवारांचा विचार चालला होता. अशी एक चर्चा होती. मात्र ही चर्चा सुरू असताना कॉंग्रेसची अवस्था जरा बरी होती. आता काही तशी ती राहिलेली नाही. त्यामुळे आता त्यांना कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याचा मोह होईल असे दिसत नाही. उलट कॉंग्रेसपक्ष एवढा क्षीण झाला आहे की त्या पक्षात येण्याचा मोह पवारांनाच काय या देशात आज तरी कोणाला होणार नाही. विलिनीकरण करण्याचा कसलाच फायदा शरद पवारांना दिसत नाही. कारण केंद्रातली सत्ता तर गेलीच आहे आणि ती बरीच वर्षे हाती येण्याची शक्यता नाही. काही उतावळ्या कॉंग्रेस नेत्यांना नरेंद्र मोदी यांचे सरकार लवरकच कोसळेल आणि पुन्हा मध्यावधी निवडणुका होऊन आपले सरकार येईल अशी आशा वाटत आहे. एखाद्या वर्षभरातच असे घडेल इथंपर्यंत कॉंग्रेसचे हे कार्यकर्ते आशावादी आहेत. काही दिवसांनी महागाई वाढेलच तेव्हा ती तशी वाढली की कॉंग्रेसचे प्रचंड मोठे आंदोलन होईल आणि त्या आंदोलनाच्या वणव्यात मोदी सरकार बरखास्त होऊन जाईल असे या नेत्यांचे स्वप्न आहे. कॉंग्रेसचे स्वप्न काहीही असो पण शरद पवार काही तेवढे भाबडे नाहीत. त्यांना वस्तुस्थिती कळते.

पवार कधीही सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. आता केंद्रात तर त्यांना सत्ता नाहीच तेव्हा राज्यात तरी ती मिळेल का याची ते वाट पाहत आहेत. केंद्रात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि एखाद्या मंत्रिपदाच्या बदल्यात भाजपाला राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा अशी सौदेबाजी करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु भाजपालाच स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे सगळेच मुसळ केरात गेले. अन्यथा, भाजपाप्रणित रालो आघाडीला स्पष्ट बहुमतासाठी दहा-पंधरा जागा कमी पडल्या असत्या तर ती उणीव भरून काढायला शरद पवार आधी त्वरेने धावून गेले असते. पण तसे झाले नाही. त्यामुळे केंद्रात सत्तेच्या जवळ जाण्याचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. आता राज्यात जर सत्ता मिळाली नाही तर पवारांसह सर्व राष्ट्रवादी नेत्यांना वेड लागायची पाळी येईल, अशावेळी पवार काय करतील हे माहीत नाही. परंतु आता त्यांनी काही करावे असे राहिलेले नाही आणि स्वतंत्रपणे राजकारण करावे अशीही त्यांची अवस्था उरलेली नाही. केंद्रात असो की राज्यात असो कोणाच्याही हातात कायम सत्ता राहत नसते.

त्यामुळे आगामी दहा वर्षात आपल्या हाती पुन्हा सत्ता येईलच अशी आशा पवारांना वाटत असणे शक्य आहे पण त्यावेळी शरद पवार जवळपास ८५ वर्षांचे झालेले असतील. अशा वृध्दावस्थेत ते कसले राजकारण करणार आहेत? पवारांची स्वतःचा पक्ष काढण्यामागची गणिते फार वेगळी होती. तीच गणिते देशातले अनेक नेते घालत बसले होते. राजकीय अस्थैर्याच्या परिस्थितीत २५-३० खासदार जवळ बाळगणारा नेता पंतप्रधान होऊ शकेल अशी शक्यता सर्वांनाच वाटत होती. पण आता सारीच परिस्थिती बदलून गेली आहे. ते राजकीय अस्थैर्य संपुष्टात आले आहे आणि देशातल्या अनेक छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांना आपल्या स्थितीचा फेरविचार करण्याची पाळी आली आहे. शरद पवारांनाही पंतप्रधानपदाचे स्वप्न बघण्याचे वातावरण आता राहिलेले नाही. एकंदरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाचे औचित्य उरलेले नाही. त्यामुळे शरद पवारांनी आपला पक्ष गुंडाळून कॉंग्रेसमध्ये विलीन होण्यास हरकत नाही असे दिग्विजय सिंग यांना वाटते. शरद पवारांनाही तसेच काही तरी वाटत असणार म्हणून त्यांनी एक खडा टाकून पाहिला आहे. आता ही सूचना दिग्विजय सिंग यांनी आपल्या मनानेच केली आहे की त्यांच्या या सूचनेचा बोलविता धनी वेगळा कोणीतरी आहे. याचा शोध घ्यावा लागणार आहे. कदाचित हा बोलविता धनी स्वतः सोनिया गांधीसुध्दा असू शकतात.

Leave a Comment